एसटीला बसली ‘कपातीची गोळी’, १५० कर्मचारी कार्यमुक्त : होळी, मे महिन्यात कर्मचाऱ्यांवर असणार ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 04:52 IST2025-02-18T04:51:16+5:302025-02-18T04:52:53+5:30

होळीचा सण तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनाच डबल ड्युटी करावी लागणार आहे.

ST hit by 'reduction bullet', 150 employees relieved of duty: There will be stress on employees during Holi and May | एसटीला बसली ‘कपातीची गोळी’, १५० कर्मचारी कार्यमुक्त : होळी, मे महिन्यात कर्मचाऱ्यांवर असणार ताण

एसटीला बसली ‘कपातीची गोळी’, १५० कर्मचारी कार्यमुक्त : होळी, मे महिन्यात कर्मचाऱ्यांवर असणार ताण

ठाणे : एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाला मिळालेल्या ५० लालपरी आणि १५ टक्के भाडेवाढीने तारले आहे. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीला राजकीय हस्तक्षेपामुळे ठाणे नियंत्रक विभागातून १५० चालक-वाहक, लिपिक आणि मेकॅनिक यांनी आपापल्या मूळ गावी बदली करून घेतल्याने कर्मचाऱ्यांची चणचण भासू लागली आहे. होळीचा सण तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनाच डबल ड्युटी करावी लागणार आहे.

केवळ ठाणे विभागच नव्हे तर पालघर, रायगड आणि मुंबई या कोकणपट्ट्यातही कर्मचारीटंचाई जाणवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे आगारात आधीच २८० ते ३०० हून अधिक रिक्त पदे आहेत. त्यातच जवळपास १५० कर्मचारी नव्या वर्षाच्या सुरुवातीला विनंती अर्जानुसार कार्यमुक्त केल्याने रिक्त पदांची संख्या वाढली. होळीला कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. परिणामी जादा गाड्या सोडाव्या लागतात. मात्र, गाड्या सोडल्या तरी अतिरिक्त मनुष्यबळ आणायचे कुठून हा प्रश्न आहे.

असा पडतोय खड्डा

मुंबई आणि ठाणे ही सुशिक्षित शहरे असल्याने येथील तरुण एसटी महामंडळात भरती होत नाहीत.

महामंडळाच्या भरती प्रक्रियेत, मराठवाडा, विदर्भ आदी भागातील तरुण मोठ्या प्रमाणात भरती होतात.

मुंबईत भरती प्रक्रियेत रुजू व्हायचे आणि नंतर राजकीय वजन वापरून डेप्युटेशनवर दोन ते तीन वर्षात स्थानिक पातळीवर जात असल्याने ही पोकळी दर दोन ते तीन वर्षांनी ठाणे, मुंबई किंवा कोकण पट्ट्यात हमखास निर्माण झाल्याची माहिती आहे.

डेप्युटेशनवर बदली

विदर्भ, मराठवाडा, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी आदी भागातील चालक-वाहकांनी विनवणी करून डेप्युटेशनवर आपली बदली करून घेतली. सांगली, सातारा आणि कोकण पट्ट्यातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसटी विभागाला  ३०० कर्मचाऱ्यांची कमतरता असून, १५० कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याने पोकळी निर्माण झाली. ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी महामंडळाकडे केली.

सागर पळसुले, विभाग नियंत्रक, ठाणे एसटी

Web Title: ST hit by 'reduction bullet', 150 employees relieved of duty: There will be stress on employees during Holi and May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.