ट्रकच्या धडकेत ठाण्यातील मसाला व्यापाऱ्याचा मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Updated: April 25, 2024 22:17 IST2024-04-25T22:16:52+5:302024-04-25T22:17:13+5:30
माजीवडा नाक्यावरील घटना: ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

ट्रकच्या धडकेत ठाण्यातील मसाला व्यापाऱ्याचा मृत्यू
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घोडबंदर ते ठाणे मार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकने स्कूटरला दिलेल्या धडकेत मितेश निलेश नागडा (३०) या मसाला व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातास कारणीभूत असलेला ट्रक चालक गणेश एकनाथ कुमावत (२४, रा. नेवाळी, मलंगरोड, कल्याण) याला ताब्यात घेतल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील माजिवडा जंक्शनजवळील नर्सरी समोर घोडबंदरकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरुन मितेश हे त्यांच्या स्कूटरवरुन टेंभी नाक्यावरील त्यांच्या घरी जात होते. त्याचवेळी पाठीमागून त्याच मार्गावरुन येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात मितेश हे गंभीर जखमी झाले. त्यांना कापूरबावडी पोलिसांनी कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या गणेश कुमावत या चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे हयगयीने वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी सांगितले.