डम्पिंगसाठी ठाण्याबाहेर जागा, महासभेत झाला निर्णय; महापौरांनी दिले भूखंड शोधण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:47 IST2020-12-26T00:46:47+5:302020-12-26T00:47:01+5:30
Thane : कोलशेत येथील मेट्रो यार्डच्या जागेचा वाद या सभेत सुरू असताना याच ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागाने जागा आरक्षित केली आहे.

डम्पिंगसाठी ठाण्याबाहेर जागा, महासभेत झाला निर्णय; महापौरांनी दिले भूखंड शोधण्याचे निर्देश
ठाणे : गेली कित्येक वर्षे डम्पिंगचा प्रश्न हा अनुत्तरितच आहे. तो सोडविण्यासाठी दिव्यातील स्थानिक नगरसेवक तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी बुधवारी झालेल्या महासभेत आवाज उठविला होता. मुंबई महापालिकेने त्यांच्या हद्दीच्या बाहेर अंबरनाथ येथे डम्पिंग सुरू केल्याने त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेनेही आपल्या हद्दीबाहेरच्या जागेचा शोध घ्यावा, असा निर्णय या महासभेने घेतला. त्यानुसार आता प्रशासनाने नवीन जागेचा शोध सुरू केला आहे.
कोलशेत येथील मेट्रो यार्डच्या जागेचा वाद या सभेत सुरू असताना याच ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागाने जागा आरक्षित केली आहे. ती ताब्यात घेण्याविषयी चर्चा सुरू असताना मढवी यांनी दिव्याचे नागरिक डम्पिंगच्या त्रासाने कंटाळले असून ते हटविण्याची मागणी केली. ठाणे शहरातील लोकवस्ती झपाट्याने वाढत असताना कचरा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. महानगरपालिकेचा एकही कचरा विल्हेवाट प्रकल्प नसून दिव्यात खाजगी जागांवर महापालिका कचरा टाकते. तेथील स्थानिकांकडून दिव्यातील डम्पिंग रद्द करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सोडण्यासाठी पर्यायी मार्गांची चाचपणी करण्याची आवश्यकता महासभेमध्ये नगरसेवकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.
नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याचे निर्देश
- शहरात कचरा विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध ठिकाणी जागा आरक्षित आहेत. परंतु, अनेक ठिकाणी त्यांच्या परिसरात गृहसंकुले उभी राहिल्याने कचरा टाकण्यासाठी दिवा डम्पिंगवर अवलंबून राहावे लागत आहे.
- विशेष म्हणजे दिव्याच्या जागेची क्षमता संपल्याने ते बंद करावे, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाने सुचविले आहे. त्यामुळे महापालिकेने पर्यायी जागांचा शोध सुरू केला होता. परंतु, कचरा प्रकल्प आपल्या भागात येऊ नये, यासाठीच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला आहे.
- पर्यायी व्यवस्था म्हणून ठाण्याबाहेरील ग्रामीण भागामध्ये जागा उपलब्ध असल्यास तिचा शोध घेऊन नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येतील का, याच्या चाचपणीचे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी प्रशासनाला दिले.