जिल्ह्यातील अंगणवाड्यांना आता स्मार्ट साज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST2021-02-25T04:54:44+5:302021-02-25T04:54:44+5:30
ठाणे : तुटकी व गळकी छपरे, मोडकळीस आलेले दरवाजे व खिडक्या, मुलांना बसण्यासाठी आसनव्यवस्था नसणे, अशी काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील ...

जिल्ह्यातील अंगणवाड्यांना आता स्मार्ट साज
ठाणे : तुटकी व गळकी छपरे, मोडकळीस आलेले दरवाजे व खिडक्या, मुलांना बसण्यासाठी आसनव्यवस्था नसणे, अशी काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील अंगणवाड्यांची झाली आहे. यामुळे या अंगणवाड्यांना नवे रूपडे देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने पावले उचलली आहेत. यानुसार राज्य शासनाने जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांतर्गत ८२ अंगणवाड्या, तर जिल्हा परिषद निधीतून ५० अशा १३२ अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यात शासनाकडून स्मार्ट करण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद निधीतून स्मार्ट करण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बाल्यावस्था ही मानवाच्या वाढ व विकासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. ख-या अर्थाने बालकांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढ सहा वर्षे वयोगटापासून होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अंगणवाडी आणि मिनी अंगणवाड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या जिल्ह्यात एक हजार ८५४ आंगणवाड्या आहेत. त्यापैकी एक हजार ९२ अंगणवाड्या मालकीच्या जागेत भरतात. तर, ७७४ अंगणवाड्या समाजमंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरत आहेत. त्यामुळे या अंगणवाड्यांना हक्काची जागा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ही पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणे अंगणवाड्यादेखील हायटेक व स्मार्ट करण्याकडे वाटचाल सुरू आहे.
भिंती होणार बोलक्या
रंगकाम केलेल्या बोलक्या भिंती, अंतर्बाह्य भिंतींवर केलेली सजावट, आतील भागात असणारी भित्तीपत्रके, पाण्यापासून ते आसनव्यवस्थेपर्यंत असणा-या दर्जेदार भौतिक सुविधा, मुलांना खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान, बैठ्या खेळांचे विविध साहित्य असा अत्याधुनिक स्मार्ट साज असलेल्या अंगणवाड्या ठाणे जिल्ह्यात उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाच्या निधीतून नऊ प्रकल्पांतर्गत ८२ अंगणवाड्या तर, जिल्हा परिषद निधीतून ५० अशा १३२ अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.