उल्हासनगरमध्ये ‘कल्याण मटका’ जुगार अड्डयावर धाडीत सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 00:29 IST2021-09-09T00:27:38+5:302021-09-09T00:29:29+5:30
उल्हासनगर मध्ये अगदी बिनधोकपणे सुरु असलेल्या ‘कल्याण मटका’ या जुगार अड्डयावर ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी धाड टाकून शब्बीर शेख याच्यासह सहा जणांना अटक केली.

उल्हासनगरमध्ये ‘कल्याण मटका’ जुगार अड्डयावर धाडीत सहा जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उल्हासनगर मध्ये अगदी बिनधोकपणे सुरु असलेल्या ‘कल्याण मटका’ या जुगार अड्डयावर ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी धाड टाकून शब्बीर शेख याच्यासह सहा जणांना अटक केली. यावेळी तीन हजार सहाशे रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उल्हासनगर क्र मांक पाच मधील जय जनता कॉलनी, मेट्रो बारच्या मागे असलेल्या मोकळया परिसरात मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश कदम, जमादार संजय भिवणकर, पोलीस हवालदार नितीन ओवळेकर, पोलीस नाईक महेश साबळे, रोशन जाधव आणि उमेश जाधव आदींच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी उल्हासनगर येथील एका मोकळ्या मैदानात जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यावेळी सोशल डिस्टसिंगचे नियम धुडकावून याठिकाणी जुगार अड्डा सुरु होता. याठिकाणी अड्डा चालविणाऱ्या शब्बीर याच्यासह जुगार खेळणारे लालू भांगरे (४९), कैलाश वाधवानी (४९), दिनेश वाधवा (२४), मनोज वाघारी (३५), चेतन कोळेकर (२६) आदी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराची सामुग्री आणि साडे तीन हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे.