एकाच माेहिमेत गिर्यारोहकांनी सर केले सह्याद्रीमधील १२ सुळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 01:16 AM2021-03-01T01:16:56+5:302021-03-01T01:17:11+5:30

गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेची रेंज सुळके क्लायम्बिंग मोहीम

In a single month, mountaineers climbed 12 peaks in Sahyadri | एकाच माेहिमेत गिर्यारोहकांनी सर केले सह्याद्रीमधील १२ सुळके

एकाच माेहिमेत गिर्यारोहकांनी सर केले सह्याद्रीमधील १२ सुळके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गिरीमित्र प्रतिष्ठान, ॲडव्हेंचर इंडिया आणि जिद्दी माउंटनिरिंग या संस्थांनी खोडकोना–मेढवन रेंजमधील नऊ सुळके, अडसूळ, भावाचा ढूक (अजिंक्य) आणि महालक्ष्मी असे पालघर जिल्ह्यातील एकूण १२ सुळके १४ ते १८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान यशस्वीरीत्या सर केले. या सर्व सुळक्यांची उंची साधारण ४०-१५० फूट होती. ही संस्थेची १७ वी मोहीम होती. 


या मोहिमेत मंगेश कोयंडे, अरविंद नवेले आणि अमोल अळवेकर सहभागी झाले होते. १४ फेब्रुवारी २०२१ ला टीम डोंबिवलीमधून बाइकने प्रवास करून दुपारी खोडकोना गावात पोहाेचली. १५ फेब्रुवारीला नवेले यांनी लीड करून केएम १ आणि केएम ४ असे सुळके सर केले, तर अळवेकर यांनी लीड करून केएम २, ३, ५ असे सुळके सर केले. 


मागोमाग इतर सदस्य सुळक्यांवर पोहाेचले. १६ फेब्रुवारीला नवेले यांनी लीड करून केएम ६, ७, ९ सुळके तर अळवेकर यांनी लीड करून केएम ८ असे सुळके सर केले. १७ फेब्रुवारी रोजी कोयंडे यांनी लीड करून अडसूळ सुळका, तर नवेले यांनी लीड करून भावाचा ढूक हा अजिंक्य सुळका सर केला. 
सोबत बाकी सदस्यदेखील होते. १८ फेब्रुवारी रोजी नवेले यांनी पुन्हा लीड करून महालक्ष्मी सुळका सर केला आणि सोबत इतर सदस्यदेखील होते. 

या मोहिमेत सिक्वेन्स क्लाइंबिंग पद्धतीचा वापर करून गाइडमन, मिडलमन आणि एण्डमन अशी आरोहणाची तांत्रिक पद्धत वापरली. 
मोहिमेमध्ये माउंटेनिरिंग रोप, कॅराबिनर, डिसेंडर, क्विकड्रॉ, पिटोन, टेपस्लिंग, डायनिमा, हॅमर, हार्नेस, हेल्मेट, पीए शूज अशा साधनांचा वापर केला. ओव्हरहँग, चिमणी क्लाइंबिंग, क्रॅक क्लाइंबिंग, चेन बोल्टिंग अशा वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून क्लाइंबिंग पूर्ण केले.


सर्व सुळक्यांच्या माथ्यावर टीमने राष्ट्रीय ध्वज आणि स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज फडकवला. 
शिवरायांच्या नावाची ललकारी दिली आणि जयघोषही केला होता. संस्थेची ही सुळके क्लाइम्बिंग मोहीम आमचे गुरू दिवंगत अरुण सावंत आणि दिवंगत राजू मोरे यांना समर्पित करत आहोत, असे कोयंडे यांनी सांगितले.

Web Title: In a single month, mountaineers climbed 12 peaks in Sahyadri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे