जखमी होऊनही ठाण्याच्या स्वराने जिंकले रौप्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 20:31 IST2018-02-06T20:24:11+5:302018-02-06T20:31:16+5:30

जखमी होऊनही ठाण्याच्या स्वराने जिंकले रौप्य पदक
ठाणे: भोपाळ येथे अलीकडेच झालेल्या चौथ्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेत खेळताना, पहिल्याच राऊंडमध्ये मनगटाच्या हाडाला जबर मार लागल्यानंतरही प्रतिस्पर्धींना टक्कर देत,ठाण्याच्या स्वरा कांबळे हिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिची थायलंड येथे होणाºया आगामी अशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शुक्रवार २ ते रविवार ५ फेब्रवारी २०१८ दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळ येथे चौथ्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी विविध गटात झालेल्या स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते.त्यातील ११ वर्षाखालील वयोगटात खेळताना,या स्पर्धेच्या पहिल्याच राऊंडमध्ये तिच्या मनगटाच्या हाडाला जबर मार लागला. यावेळी रेफरीने तिच्याकडे पुढे खेळणार का, अशी विचारणा केली. त्यावेळी तिने या स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगून पुढील झालेल्या प्रत्येक राऊंडमध्ये स्पर्धकांना जोरदार टक्कर देत, रौप्य पदक खेचून आणले. स्वरा ही बाळा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली थाई बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती तिचे वडील राजेश कांबळे यांनी दिली.