ठाण्यात चारनंतर दुकानाचे शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST2021-06-29T04:27:03+5:302021-06-29T04:27:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य शासनाने निर्बंध कडक केल्याने सोमवारी ठाण्यातील सर्व मॉल्स बंद होते, ...

ठाण्यात चारनंतर दुकानाचे शटर डाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य शासनाने निर्बंध कडक केल्याने सोमवारी ठाण्यातील सर्व मॉल्स बंद होते, तर व्यापारी वर्गानेही सायंकाळी चारनंतर दुकाने बंद केली. ठाणे नगर पोलिसांनी मुख्य बाजारपेठेत जनजागृती करीत व्यापारी व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभला.
ठाणे महापालिकेचा यापूर्वी दुसऱ्या स्तरात समावेश होता. यामुळे सर्व व्यवहार खुले झाले होते. दुकाने, हॉटेल, मॉलमधील व्यवहार पूर्ववत झाले होते. मात्र, डेल्टा प्लस विषाणूचा वाढता प्रभाव व संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू केले. ठाण्यात सर्व दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहणार व सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू होणार, असे स्पष्ट केले. ठाणे शहरात दुकाने सायं. चार वाजेपर्यंत सुरू होती. काही ठिकाणी अर्धवट शटर उघडून दुकाने सुरू होती, परंतु अनेक दुकानदारांनी कारवाईच्या भीतीने दुकाने बंद केली. ठाण्यातील मॉल सोमवारपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. शहरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यापूर्वीच पूर्णपणे बंद होती. उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या ५० टक्के सायं. ४ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात आली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळीच ठाणे नगर पोलिसांनी जनजागृती करीत व्यापारी आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ठाणे महापालिका हद्दीतील खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेसह चार वाजेपर्यंत खुली होती.
..............
वाचलीेे