कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले श्रीपाल जैन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 23:50 IST2021-05-01T23:50:25+5:302021-05-01T23:50:42+5:30
डॉ.जैन यांनी आपल्या क्लिनिकमध्ये कोविड रुग्णांवर उपचारास सुरुवात केली. पाहता-पाहता पद्मानगर पाठोपाठ भिवंडी शहरासह ग्रामीण भागातून त्यांच्या क्लिनिकमध्ये दिवसाला ७० ते ८० पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी येऊ लागले.

कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले श्रीपाल जैन
नितीन पंडित
भिवंडी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना, अनेक डॉक्टरांनी आपला दवाखाना बंद ठेवला होता. मात्र, पद्मानगर येथील डॉ.श्रीपाल जैन हे आपले क्लिनिक सुरू ठेवून शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. पहिल्या लाटेपासून आजतागायत त्यांनी आपले रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांची शुश्रूषा करत आहे.
डॉ.जैन यांनी आपल्या क्लिनिकमध्ये कोविड रुग्णांवर उपचारास सुरुवात केली. पाहता-पाहता पद्मानगर पाठोपाठ भिवंडी शहरासह ग्रामीण भागातून त्यांच्या क्लिनिकमध्ये दिवसाला ७० ते ८० पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी येऊ लागले. सध्या सकाळी ९ ते ३ व सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत क्लिनिकमध्ये भिवंडी शहर व तालुक्यासह मुलुंड, ठाणे, मीरा- भाईंदर, वालीव, वसई, पडघा, वाडा, शहापूर या परिसरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांची गैरसाेय हाेत हाेती.
येथे आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण बरे झाल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करतानाच, त्यांच्यामुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले, अशी कबुली वसई येथून उपचारासाठी येणाऱ्या रोहन मोहिते यांनी दिली. या क्लिनिकमध्ये उपचार घेऊन बरे होणारे अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.
एका घरातील तीन-तीन जणांना कोरोना बाधा होऊन, वडिलांची ऑक्सिजन पातळी खालावलेली असताना आम्ही सर्व जण सरकारी रुग्णालयात उपचार न घेता, डॉ.जैन यांच्यावरील विश्वासामुळे त्यांच्याकडे उपचार घेऊन बरे झाल्याचे समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया अंबाडी येथील नितेश जाधव यांनी दिली.
दिवस संपतो पहाटे ३ वाजता
डॉ.जैन हे अवघे ४२ वर्षांचे आहेत. सकाळी नझराणा कम्पाउंड व नंतर पद्मानगर क्लिनिकमध्ये सकाळ, संध्याकाळ प्रॅक्टिस करतात. आदर्श पार्क येथे भगवान महावीर रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांच्या तपासणीसाठीही वेळ काढून जात असल्याने, सकाळी ९ वाजता सुरू होणारा दिवस रात्री दोन किंवा तीन वाजता संपतो. रुग्णांवर उपचार करीत असताना, आलेल्या रुग्णास घाबरून न जाता उपचार घेऊन बरे होता येते, हा विश्वास देत असल्याने व उपचाराने रुग्ण बरे होत असल्याने समाधान मिळत असल्याची प्रतिक्रिया डॉ.जैन यांनी व्यक्त केली.