चोरट्यांच्या हल्ल्यात दुकानमालकाचा मृत्यू

By Admin | Updated: January 28, 2017 02:49 IST2017-01-28T02:49:04+5:302017-01-28T02:49:04+5:30

शहराजवळ सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गुरु देव कम्पाउंड येथील किराणा मालाच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने शटर उचकटून

Shop owner's death in the thief | चोरट्यांच्या हल्ल्यात दुकानमालकाचा मृत्यू

चोरट्यांच्या हल्ल्यात दुकानमालकाचा मृत्यू

भिवंडी : शहराजवळ सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गुरु देव कम्पाउंड येथील किराणा मालाच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने शटर उचकटून घुसलेल्या दोघा चोरट्यांनी दुकानमालक सुरेश गुप्ता व त्यांची पत्नी सुनीता यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा, त्यांनी आरडाओरडा करताच चोरांनी त्या दोघांवर चाकूने हल्ला केला. यात मालक गुप्ता यांचा मृत्यू झाला.
गुरु देव कम्पाउंडमधील इमारतीत गुप्ता यांचे किराणा मालाचे दुकान असून त्यावरील फ्लॅटमध्ये त्यांचे कुटुंबीय राहते. रविवारी गुप्ता यांच्या मुलीचा विवाह झाला. घरी पाहुणे असल्याने गुप्ता व त्यांची पत्नी बुधवारी दुकानात झोपले होते. रात्रीच्या सुमारास दोन चोर दुकानात शिरले. त्यांच्या आवाजाने गुप्ता दाम्पत्य जागे झाले. चोरांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता सुनीता यांनी आरडाओरड केली. चोरट्यांनी धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केला. सुरेश यांच्या पोटात रक्तस्राव सुरू झाला, तर सुनीता याही जखमी झाल्या. या घटनेने भेदरलेल्या चोरट्यांनी तेथून पळ काढला. सुनीता यांनी प्रसंगावधान राखत कुटुंबीयांना जागे करून गुप्ता यांना रु ग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान, गुप्ता यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सुनीता यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या चोरट्यांनी परिसरातील अन्य दोन दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला. मेडिकल दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचे चित्रीकरण कैद झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shop owner's death in the thief