धक्कादायक! ठाण्यात धर्मवीर नगरातील तरुणांकडे मिळाली तलवार आणि गुप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:20 IST2019-02-04T21:13:24+5:302019-02-04T21:20:58+5:30
डोंबिवलीत भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्याकडून पोलिसांनी अलिकडेच मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यापाठोपाठ ठाण्याच्या धर्मवीरनगरातूनही दोघा तरुणांकडून पोलिसांनी तलवार आणि गुप्ती जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चितळसर पोलिसांची कारवाई
ठाणे: शस्त्रे बाळगणा-या सौरभ वर्तक (३२) आणि प्रसाद पालांडे (२०) या दोघांना चितळसर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून तलवार, गुप्ती आणि लाठी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी डोंबिवलीत भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्याकडून मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातही ही शस्त्रे मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धर्मवीर नगर भागातील महाराष्ट्र नगर येथे काहीजण शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल घुगे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घुगे यांच्यासह उपनिरीक्षक तुकाराम बांगर, पोलीस नाईक राजाराम जाधव आणि कॉन्स्टेबल किरण रावते आदींच्या पथकाने सापळा रचून महाराष्ट्रनगर भागात २ फेब्रुवारी रोजी एक संशयित कार अडविली. याच कारच्या तपासणीमध्ये तलवार आणि एक गुप्ती या पथकाला मिळाली. याप्रकरणी सौरभ आणि प्रसाद या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या शस्त्रांचा ते कशासाठी वापर करणार होते? ते कुठे नेणार होते? आदी बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.