धक्कादायक! ठाण्यात गळयावर वार करुन महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 21:19 IST2020-05-29T20:59:43+5:302020-05-29T21:19:38+5:30
ठाण्याच्या राबोडीतील एका महिलेच्या गळयावर चाकूने वार करुन तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली आहे. हा खून कोणी आणि का केला? याचा तपास राबोडी पोलीस करीत आहेत.

खूनानंतर मृतदेह रस्त्यावरील ट्रकच्या बाजूला फेकला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राबोडीतील साकेतकडून कळवा उड्डाण पूलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रेशमा खातून अन्सारी (४२, रा. राबोडी, ठाणे) या महिलेचा मृतदेह गळयावर चाकूने वार केलेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
रेशमा आणि खातून हे पती पत्नी १५ आणि १६ वर्षीय दोन मुलांसह दुसरी राबोडी भागातील तयाब्बा मस्जिदजवळ वास्तव्याला आहेत. २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रेशमा काही कामानिमित्त घराबाहेर पडली. तर तिचा पती मुंब्रा येथील त्याच्या बेकरीमध्ये कामावर गेला होता. सायंकाळी घराबाहेर पडल्यानंतर ती घरी परतलीच नव्हती. रात्री तिचा पती घरी परतला, त्यावेळीही ती न आल्यामुळे तिचा त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी तो राबोडी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार देणार होता. दरम्यान, त्याचवेळी २९ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आकाशगंगा, शिवाजीनगर भागात साकेतकडून कळवा पूलाकडे जाणा-या मार्गावरील एका ट्रकच्या बाजूला असलेल्या पदपथाजवळ तिचा मृतदेह काही नागरिकांना आढळला. बाळकूम रोडवरील पोलीस कवायत मैदानाजवळील जयकुमार कंपनीच्या गोदामासमोरील ट्रकपार्र्किंगच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर हा मृतदेह फेकलेला होता. चॉपर किंवा धारधार हत्याराने गळयावर वार करुन तिचा खून केलेला होता. ही माहिती मिळताच नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि राबोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तिची हत्या २८ मे रोजी सायंकाळी ७ ते २९ मे रोजी सकाळी ९ या दरम्यान झाल्याची शक्यता आहे. मात्र, हा खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला, याचा तपास अद्याप सुरु असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.