धक्कादायक! केवळ हॉर्न वाजविल्याच्या कारणावरुन व्यावसायिकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 01:07 IST2020-07-04T00:43:07+5:302020-07-04T01:07:26+5:30
मोटारसायकल उभी करण्यासाठी हॉर्न वाजविल्याच्या रागातून समोर उभे असलेल्या २७ वर्षीय संकेत यादव याने डेरिक ओरमन यांना मारहाण केल्याची घटना ठाण्याच्या अल्मेडा चौक भागात बुधवारी घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: स्कूटर पार्क करायची असल्याने डेरिक ओरमन यांनी हॉर्न वाजविला. मात्र, त्यांनी हॉर्न वाजविल्याच्या कारणावरुन तिथे उभे असलेल्या संकेत यादव (२७, रा. पाचपाखाडी, ठाणे) याने त्यांच्या श्रीमुखात लगावून मारहाण केल्याची घटना १ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी यादव यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभीनाका, तेलागल्ली येथील रहिवाशी डेरिक हे १ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने त्यांच्या अल्मेडा चौक येथील शिवानंद उद्योग संकुल येथे जात होते. त्यांना त्यांची मोटारसायकल पदपथावर उभी करायची असल्यामुळे त्यांनी हॉर्न वाजवला. याच क्षुल्लक कारणावरुन तिथे उभे असलेल्या यादव यांनी चापटीने मारहाण करीत त्यांना शिवीगाळही केली. नौपाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.