धक्कादायक! ठाण्यात केवायसी करण्याच्या नावाखाली जेष्ठ नागरिकाची आठ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:14 IST2020-04-17T23:52:59+5:302020-04-18T00:14:53+5:30
‘तुमचे पेटीएम बंद झाले असून तुमची केवायसी रिन्यू करावी लागणार आहे’, अशी बतावणी करीत ठाण्यातील एका जेष्ठ नागरिकाची सात लाख ९९ हजार ९९७ रुपयांची राहूल मिश्रा नामक भामटयाने आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला.

पेटीएम आणि एनईएफटीद्वारे काढली रोकड
लोकमत न्यून नेटवर्क
ठाणे: केवायसीचे नूतनीकरण करायचे असल्याची बतावणी करुन नौपाडयातील ६४ वर्षीय जेष्ठ नागरिकाची सात लाख ९९ हजार ९९७ रुपयांची राहूल मिश्रा नामक भामटयाने आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्याच्या खोपट भागातील हे तक्रारदार व्यावसायिक आपल्या घरी असतांना १५ एप्रिल रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर राहूल मिश्रा या अनोळखी व्यक्तीने फोन केला. तुमचे पेटीएम बंद झाले असून ‘तुमची केवायसी रिन्यू करावी लागणार आहे’, अशी त्याने त्यांना बतावणी केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या जेष्ठ नागरिकाने गुगलद्वारे एका नविन अॅप आणि कॅनरा बॅकेचे मोबाईल अॅप चालू केले. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून त्याने दुपारी ४ वाजून १२ मिनिट ते ७ वाजून १४ मिनिटांच्या कालावधीमध्ये त्यांचे पेटीएम आणि कॅनरा बँकेच्या एनईएफटीद्वारे सात लाख ९९ हजार ९९७ रुपयांची रक्कम अन्य बँक खात्यामध्ये आॅनलाईन वळती केली. या जेष्ठ नागरिकाने नंतर बँकेशी संपर्क साधला असता, बँकेने अशी कोणतीही केवायसी मागितली किंवा नूतणीकरणासाठी विचारणा केली नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी त्यांनी १६ एप्रिल रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी राऊत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.