उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल
By धीरज परब | Updated: June 14, 2024 23:45 IST2024-06-14T23:42:48+5:302024-06-14T23:45:58+5:30
तारा घरत आणि त्यांचा मुलगा पवन यांचा शिंदेसेनेत प्रवेश हा मीरा-भाईंदर मधील उद्धव ठाकरे सेनेच्या गळतीची सुरुवात मानली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश घडून आला आहे.

उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल
मीरारोड - ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर भाईंदर मधील उद्धव ठाकरे सेनेचे युवा सेना शहरअध्यक्ष पवन घरत व माजी शिवसेना नगरसेविका तारा घरत यांनी शुक्रवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
तारा घरत आणि त्यांचा मुलगा पवन यांचा शिंदेसेनेत प्रवेश हा मीरा-भाईंदर मधील उद्धव ठाकरे सेनेच्या गळतीची सुरुवात मानली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश घडून आला आहे. ठाकरे सेनेत स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजीला आधीच कट्टर शिवसैनिक व्यथित आहेत. त्यातच विचारे यांच्या पराभवा मुळे स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व नसल्याने घरत कुटुंबीयांनी आ. सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंसेनेत प्रवेश केल्याचे त्यांच्या समर्थकां कडून सांगण्यात येते.
तारा व पवन घरत यांच्या पक्ष प्रवेश वेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, मीरा भाईंदर शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, माजी विरोधी पक्षनेते धनेश पाटील, उत्तर प्रदेश संपर्कप्रमुख विक्रमप्रताप सिंह आदी उपस्थित होते.