‘शिव मंदिर परिसराचा विकास करणार’
By Admin | Updated: May 8, 2017 05:56 IST2017-05-08T05:56:12+5:302017-05-08T05:56:12+5:30
शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलपुरताच परिसर चांगला, सुशोभित झाला आहे असे नाही, तर या संपूर्र्ण परिसराचा नियोजनबद्ध असा कायमस्वरूपी

‘शिव मंदिर परिसराचा विकास करणार’
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलपुरताच परिसर चांगला, सुशोभित झाला आहे असे नाही, तर या संपूर्र्ण परिसराचा नियोजनबद्ध असा कायमस्वरूपी विकास करण्यात येणार आहे. त्याबाबतचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या परिसराचा विकास करताना निधीची कमतरता भासू देणार नाही, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
प्राचीन शिव मंदिराच्या प्रांगणात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तीन दिवस शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल झाला. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्र्यांनी वरील माहिती दिली. या महोत्सवामुळे शिव मंदिराची ख्याती सर्वत्र पसरली आहे. महोत्सवाचा दर्जाही उंचावलेला आहे. विशेष म्हणजे या शहरात कलेचे दर्दी आहेत, असे ते म्हणाले. महोत्सवाचा दर्जा हा काळाघोडा महोत्सवाच्या बरोबरीचा झाला आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्याच्या पुढे अंबरनाथ गेले आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
या परिसरात चांगल्या पद्धतीच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात पार्किंग, उद्यान, चांगले स्वच्छतागृह, निवास व्यवस्था, खानपान व्यवस्था आदींचा समावेश असेल. यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांना विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पुरातत्त्व खाते, सार्वजनिक बांधकाम खाते अशा विविध खात्यांशी समन्वय साधणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या सर्व कामांसाठी निधीची अजिबात कमी पडू देणार नाही. ठाणे जिल्हा नियोजन समिती, पर्यटन विभाग आणि अन्य खात्यांकडूनही निधी देण्याचा मनोदय व्यक्त केला.
कायमस्वरूपी रोषणाई
या फेस्टिव्हलच्या निमित्ताने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिव मंदिरावर नेत्रदीपक रोषणाई केली आहे. ती कायमस्वरूपी राहावी, यासाठी खासदारांनी आपल्या निधीत तरतूद केल्याचे शिंदे यांनी नमूद केले.