भाजपच्या बॅनरबाजीला शिवसेनेचे सडेतोड उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST2021-05-29T04:29:32+5:302021-05-29T04:29:32+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेल्या घनकचरा व्यवस्थापन कर वसुलीप्रकरणी भाजपने पालकमंत्र्यांवर निशाणा साधून त्यांच्याविरोधात शहरात बॅनरबाजी केली आहे. ...

Shiv Sena's unequivocal answer to BJP's banner waving | भाजपच्या बॅनरबाजीला शिवसेनेचे सडेतोड उत्तर

भाजपच्या बॅनरबाजीला शिवसेनेचे सडेतोड उत्तर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेल्या घनकचरा व्यवस्थापन कर वसुलीप्रकरणी भाजपने पालकमंत्र्यांवर निशाणा साधून त्यांच्याविरोधात शहरात बॅनरबाजी केली आहे. हा कर भाजपनेच लागू केला आणि आता भाजपच उलट्या बोंबा मारत असल्याची टीका शिवसेनेने या बॅनरबाजीला प्रत्युत्तर देताना केली.

शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापन कर हा भाजप सरकारच्या काळात लागू करण्यात आला. कर वसुलीचा जीआर काढला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बॅनरबाजी करून त्यांना लक्ष्य करणे म्हणजे उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार आहे. भाजपचा हा खोटारडेपणा आहे. भाजप सरकारने जीआर काढला, तेव्हा आमदार चव्हाण यांनी विरोध का केला नाही. कर लागू होऊन वसुली सुरू झाली, तेव्हा आमदारांना जाग आली आहे का, असा प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने लागू केलेला कर आणि त्याची वसुली रास्त नाही, ही बाब आम्ही मान्य करतो. कारण सध्या कोरोना काळात जनता आर्थिक विवंचनेत आहे. शिवसेना जनसामान्यांच्या पाठीशी कायम असते. काय चांगले आणि काय वाईट हे भाजपने शिवसेनेला शिकवू नये, असा सल्लाही यानिमित्ताने म्हात्रे यांनी दिला आहे.

दरम्यान, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यासंदर्भात सांगितले की, महापालिकेकडून लागू करण्यात आलेला कर हा अयोग्य आहे. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हा कर रद्द करण्यासंदर्भात विचारविनीमय केला जाईल. ज्या गोष्टीमुळे नागरिकांना त्रास होईल, त्याला आमचा कायम विरोध असेल, असे आ. भाेईर म्हणाले.

--------------

Web Title: Shiv Sena's unequivocal answer to BJP's banner waving