महापालिकेच्या लसींवर शिवसेनेचे मार्केटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:50+5:302021-06-29T04:26:50+5:30
ठाणे : ठाण्यात मोफत लसीकरण होत असताना महापालिकेकडून मिळालेल्या लसींवर सध्या शिवसेना मार्केटिंग करीत असल्याचा आरोप ठाणे ...

महापालिकेच्या लसींवर शिवसेनेचे मार्केटिंग
ठाणे : ठाण्यात मोफत लसीकरण होत असताना महापालिकेकडून मिळालेल्या लसींवर सध्या शिवसेना मार्केटिंग करीत असल्याचा आरोप ठाणे शहर भाजपने केला आहे. मोफत लस उपलब्ध असताना शिवसेना शाखेतून मात्र आपल्या नेत्यांचे फोटो लावून मोफत लसीकरणाचे मार्केटिंग केले जात असल्याचा दावा भाजपने केला आहे. सोमवारी भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यातही महापौर कार्यालयाकडून शिवसेनेच्या नगरसेवक आणि शिवसैनिकांना प्राधान्य दिले जात असून त्यांच्याच कार्यालयातून फायनल यादी केली जात असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.
सोमवारी दुपारी भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, गटनेते मनोहर डुंबरे, शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे, नारायण पवार, मिलिंद पाटणकर, नम्रता कोळी आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. शिवसेनेच्या वतीने लसीकरणात पक्षपातीपणा केला जात आहे. त्यांना जर मोफत लस द्यायची असेल तर त्यांनी विकत घेऊन ती ठाणेकरांना मोफत द्यावी, असा सल्लाही या वेळी डावखरे यांनी दिला आहे. केंद्रानेच मोफत लसीकरण करण्यास प्राधान्य दिलेले आहे. त्यानुसार महापालिकेकडून मोफत लस घेऊन त्यावर शिवसेना नेत्यांची बॅनरबाजी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तर नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांनी प्रभाग क्र. ११ मध्ये ठाणे शहर कोरोनामुक्त करण्याकरिता हातभार म्हणून ४ मे व १६ जून असा दोन वेळा ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला. यात त्यांनी ठाणे महापालिका आरोग्य विभाग व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे या त्यांच्या संस्थेतर्फे प्रभाग क्र. ११ मधील ४ ठिकाणी विनामूल्य लसीकरण शिबिर आयोजित करण्याबाबत विनंती केली. संपूर्ण दिवसाच्या या शिबिरामध्ये किमान पाच हजार लसींचा विनामूल्य पुरवठा व कर्मचारी वर्गाची व्यवस्था करावी, अशी विनंतीही केली. आयुक्तांकडेही याबाबत पत्रव्यवहार केला, मात्र अद्यापही त्यांच्या निवेदनाला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
...........
ज्यांची पहिली पत्रे आलेली आहेत, त्या सर्वांना प्राधान्य दिले जाणार आहे, भाजप यात राजकारण करीत आहे. १३५ नगरसेवकांना एकाच वेळेस लस देता येणार नाही. त्यामुळे सर्वांना टप्प्याटप्प्याने केंद्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच झोपडपट्टीत आमचे कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. परंतु, यांचे कार्यकर्ते डिजिटल असल्याने ते फक्त सोशल मीडियावर दिसतात. ते त्यांचे दुर्दैव आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा केलेला नाही.
- नरेश म्हस्के, महापौर, ठामपा