उल्हासनगरात शिवसेनेला भगदाड
By Admin | Updated: January 31, 2017 03:30 IST2017-01-31T03:30:08+5:302017-01-31T03:30:08+5:30
शिवसेनेत इनकमिंग सुरू असतानाच नगरसेविका भानुशाली यांनी ओमी टीममध्ये प्रवेश करत पक्षात सारे आलबेल नसल्याचे उघड केले. भानुशाली यांच्यापाठोपाठ

उल्हासनगरात शिवसेनेला भगदाड
उल्हासनगर : शिवसेनेत इनकमिंग सुरू असतानाच नगरसेविका भानुशाली यांनी ओमी टीममध्ये प्रवेश करत पक्षात सारे आलबेल नसल्याचे उघड केले. भानुशाली यांच्यापाठोपाठ अनेक जण पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत आहेत आणि ओमी कलानी टीम आणि भाजपा त्यांच्यासाठी गळ टाकून बसल्याची चर्चा आहे.
उल्हासनगरात भाजपाने ओमी कलानींसह रिपाइंच्या आठवले गटाला सोबत घेत शहर विकास आघाडी तयार केली. शिवसेनेने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. शहराचा विकास डोळ्यांसमोर ठेवून विकास आघाडी बनवल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देतानाच धूळखात पडलेल्या शहर विकास आराखड्याला सत्ता येताच १५ दिवसांत मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. एकीकडे ओमी टीमसह भाजपातील असंतुष्ट शिवसेना, साई पक्षात प्रवेश घेत आहेत. त्याच वेळी सेनेच्या नगरसेविका अनिता भानुशाली यांनी ओमी टीममध्ये प्रवेश घेत धक्का दिला.
शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी असून तिकीट वाटपादरम्यान मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच पक्षाचा बंंडखोरांशी सामना रंगणार आहे. शिवसेनेत तिकिटासाठी प्रस्थापित नगरसेवकांसह त्यांचे भाऊ, बहीण, पत्नी, आई, मेहुणे आदींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सामान्य शिवसैनिकांना डावलून घरातच एकापेक्षा जास्त तिकिटांचे वाटप होणार असल्याने मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
कट्टर सैनिकांची हेळसांड
गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सांगेल ते काम केले. २००७ च्या निवडणुकीत फक्त तीन मतांनी पराभूत झाले, तर २०१२ मध्ये निवडून आले. तरीही, पक्षात सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नसल्याची प्रतिक्रिया नगरसेविका अनिता भानुशाली यांनी दिली. कट्टर शिवसैनिकांची नेहमी हेळसांड होत असून अपमानाची वागणूक मिळत असल्याची भावना शिवसेना शाखाप्रमुख सचिन भानुशाली यांनी व्यक्त केली. या प्रकाराला कंटाळून ओमी कलानी टीममध्ये प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले.