कोरोनामुळे शिवसेना गटनेते घाडीगावकर यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:40 IST2020-08-08T00:40:14+5:302020-08-08T00:40:23+5:30
कोरोनाकाळात त्यांनी प्रभागातील नागरिकांना मदतीचा हात दिला. मधुमेहाचा त्यांना आजार होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली

कोरोनामुळे शिवसेना गटनेते घाडीगावकर यांचा मृत्यू
कल्याण : केडीएमसीतील शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांचा कोरोनामुळे गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मुुलुंडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. घाडीगावकर गेली अनेक वर्षे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. उपशहरप्रमुखपदही त्यांनी भूषविले होते. २०१५ च्या महापालिकेच्या निवडणुकीत ते अशोकनगर-वालधुनी प्रभागातून नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यानंतर, त्यांना महापालिकेत गटनेतेपद दिले होते. सगळ्या प्रकारची पदे त्यांनी उत्तमरीत्या भूषविली होती.
कोरोनाकाळात त्यांनी प्रभागातील नागरिकांना मदतीचा हात दिला. मधुमेहाचा त्यांना आजार होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला त्यांना कल्याणच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, त्यांना मुलुंडमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. २९ दिवस ते कोरोनाशी लढा देत होते. अखेर, गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवसेनेवर दु:खाचे सावट कोसळले आहे. एक चांगला कार्यकर्ता संघटनेने गमाविला असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेतून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, घाडीगावकर यांच्यापूर्वी परिवहन सदस्य नाना यशवंतराव यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता.