उल्हासनगरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात, शिवसेनेकडून डंपिंग हटावची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 18:02 IST2020-07-28T17:56:25+5:302020-07-28T18:02:50+5:30
दरम्यान उसाटने गाव हद्दीतील ३० एकर जमीन विनामूल्य महापालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी आमदार बालाजी किणीकर यांनी पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

उल्हासनगरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात, शिवसेनेकडून डंपिंग हटावची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : डंपिंगमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी करून हटावची मागणी महापालिका आयुकतांना केली. दरम्यान उसाटने गाव हद्दीतील ३० एकर जमीन विनामूल्य महापालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी आमदार बालाजी किणीकर यांनी पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं -५ परिसरातील डंपिंग ग्राउंडला दुर्गंधी पसरली असून स्थानिक हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. डंपिंग हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन, मोर्चा, उपोषण, अधिकाऱ्यांना घेराव, कचऱ्याच्या गाडीला अटकाव आदी आंदोलन केले. मात्र डंपिंगला पर्यायी जागा मिळाल्यानंतर डंपिंग हटवण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले. दरम्यान राज्य शासनाने हाजीमलंग परिसरातील उसाटणे गाव हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा देण्याला तात्विक मान्यता दिली. मात्र आतापर्यंत जागा महापालिकेला हस्तांतरित झाली नाही. आमदार बालाजी किणीकर यांनी गेल्या आठवड्यात पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उसाटने गाव हद्दीतील व एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा विनामूल्य महापालिकेला कचरा व्यवस्थापन यंत्रणा बसविण्याची देण्याची मागणी केली.
आमदार बालाजी किणीकर यांच्या मागणीला बळ मिळण्यासाठी महापालिका सभागृह नेते व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना निवेदन देऊन कॅम्प नं-५ येथील डंपिंग हटविण्याची मागणी केली. चौधरी यांच्या मागणीला इतर पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. महापालिकेकडे पर्यायी जागा नसल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केनी यांनी दिली. तर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी निवेदन स्वीकारून डंपिंग बाबत माहिती घेत असल्याचे म्हटले. पावसाळ्यात डंपिंग ग्राउंड परिसरात दुर्गंधी तर उन्हाळ्यात डंपिंगला आग लागून धुराने नागरिक हैराण होत असल्याची माहिती राजेंद्र चौधरी यांनी देवून २० हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे.
डंपिंग ग्राउंड झाले ओव्हरफ्लो
म्हारळ गाव हद्दीतील महापालिकेचे डंपिंग ग्राउंड तीन वर्षापूर्वी ओव्हरफ्लो झाल्यानंतर नाईलाज म्हणून कॅम्प नं-५ येथील खडी मशीन खदानीत डंपिंग सुरू केले. डंपिंग ग्राउंडला सुरुवातीपासून विरोध झाला असून आता शिवसेना डंपिंग विरोधात रस्त्यावर उतरली आहे.