ठाणे/भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केल्याने राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे.भाजपापुरस्कृत अपक्षाला शिवेसेनेने पक्षात घेण्याची खेळी केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडली, तेवढीच राष्ट्रवादीत नाराजी पसरली. त्याचा फायदा घेत भाजपाने वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करायला लावत राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या गोटात वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. भाजपाच्या नेत्यांनी अशा वाटाघाटी सुरू असल्याचे उघड केल्याने सत्ता स्थापन होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला कधी नव्हे, एवढे महत्त्व आले आहे.शिवसेनेचे ठाणे ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी शिवसेनेला स्वबळावर बहुमत मिळाले, तरी राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीलाही सत्तेत सहभागी करून घेणार असल्याची आमची भूमिका कायम आहे, असेही त्यांनी सांगितले.त्या पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळ््यामामा यांनी तर खासदार कपिल पाटील यांच्यावर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांनी पराभव मान्य करायला हवा. सत्तेत आम्हीच असू, हे पाटील यांनी स्वीकारावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.राष्ट्रवादीचे स्थानिक नेते इरफान भुरे यांनीही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले. त्यामुळे ते एकत्र सत्तेत असतील, असा विश्वास व्यक्त केला. भाजपासोबत जाण्याचा विचार नसल्याचे सांगताना आम्ही एकत्र काम करत राहू, असे त्यांनी सांगितले.भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख दयानंद चोरघे यांनी मात्र पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे मान्य केले. ठाणे जिल्ह्याचा, ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी निधी आणण्याचे काम भाजपाच करू शकते, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीसाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत.शेलारला आले महत्त्व-निकाल लागताच लगेचच भिवंडीतील शेलार गटातील आणि शेलार, कोलिवली या गणात फेरमतदान होणार होते. मात्र त्याची तारीख निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेली नाही. भाजपाने आपला पुरस्कृत अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र आणले. काँग्रेसच्या सदस्याचे मन वळवले, तर त्यांना एका जागेची गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्या आशा शेलार गटावर केंद्रित आहेत. यामुळे शेलार गटातील फेरमतदानाला महत्त्व आले आहे.
ठाणे: शिवसेना-भाजपा दोघांचाही राष्ट्रवादीसोबत सत्तेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:16 IST