"क्लस्टर योजनेमध्ये शिवसैनिकांचा खोडा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:56 IST2020-10-08T00:56:05+5:302020-10-08T00:56:10+5:30
भाजपचा आरोप; सर्व्हे बंद पाडण्याचा प्रयत्न

"क्लस्टर योजनेमध्ये शिवसैनिकांचा खोडा"
ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेला शिवसेनेच्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत असून मंगळवारी ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीच्या अंतर्गत येत असलेल्या आजाद नगर परिसरातील बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम स्थानिक शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांकडून बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप भाजपने केला आहे. सर्व्हेचे काम सुरु राहावे यासाठी भाजपचे स्थानिक नगरसेवक घटनास्थळी पोहोचल्याने शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाºयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मात्र केवळ २० टक्के लोकांचा या सर्व्हेला विरोध असल्याने अखेर काही वेळातच सर्वेक्षण पूर्ण केले.
पालकमंत्री शिंदे यांनी अनेक महिने क्लस्टर योजनेचा पाठपुरावा करून या योजनेला मूर्त स्वरूप दिले. उथळसर, आझाद नगर परिसरात क्लस्टर योजनेसाठी यापूर्वीच टेबल सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. पात्र लाभार्थीची यादी निश्चित करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार, बायोमेट्रिक सर्व्हे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मंगळवारी काम सुरु असताना शिवसेना पदाधिकारी हेमंत पवार, अमित जयस्वाल, चंद्रकांत सुर्वे यांनी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपचे स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील हे तेथे पोहोचल्याने दोन्ही पक्षात वाद झाला.
‘योजनेला ८० टक्के नागरिकांचा पाठिंबा असून केवळ अंतर्गत राजकारण करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी या योजनेला विरोध करत आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि हक्काचा निवारा मिळावा, यासाठी ही योजना महत्त्वाची असताना शिवसेनेच्या पदाधिकाºयांची भूमिका अयोग्य आहे.’
- कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक, भाजप
‘पालिका आयुक्तांच्या आदेशाने, सर्व नागरिकांची रीतसर बैठक घेऊनच सर्व्हेचे काम सुरु करण्यात आले. काही गैरसमजातून विरोध झाला असावा, मात्र सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.’
- शंकर पाटोळे, सहायक आयुक्त, उथळसर प्रभाग समिती, ठा.म.पा.
एकनाथ शिंदे व त्यांच्या योजनेबाबत पुळका दाखवणारे दुसºया पक्षात गेले. सेनेचा अपुºया माहितीच्या आधारे होणाºया सर्व्हेला विरोध आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी द्यावी.
- अमित जयस्वाल, विभागप्रमुख