शिवसेनेत सर्वाधिक घराणेशाही, शिवसैनिकांत नाराजी; उल्हासनगर महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचाच बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 15:17 IST2022-02-16T15:16:43+5:302022-02-16T15:17:30+5:30
गेल्या महापालिका निवडणुकीत ओमी कलानी यांनी भाजपसोबत घरोबा केल्याने, भाजपची सत्ता आली. आता पप्पु कलानी जेल बाहेर असून कलानी कुटुंबाने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने, राष्ट्रवादी पक्षाचा बोलबाला राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेनेत सर्वाधिक घराणेशाही, शिवसैनिकांत नाराजी; उल्हासनगर महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचाच बोलबाला
सदानंद नाईक -
उल्हासनगर: महापालिका निवडणुकीत नवरा-बायको, दिर-भावजय, आई-मुलगा, भाऊ-भाऊ, अशा एकाच घरातील जोड्या निवडून आल्याने, शहरात घराणेशाहीचा आरोप होत आहे. सर्वाधिक घराणेशाही शिवसेनेत असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत असून त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, भाजप व रिपाइंचा नंबर लागतो.
उल्हासनगर महापालिकेवर वर्षानुवर्षे घराणेशाहीचे वर्चस्व राहिल्याने, कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाचे झेंडे उचलण्या पुरते आहेत का? असा प्रश्न कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पडला आहे. शहर शिवसेनेकडून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी-राजश्री चौधरी, धनंजय बोडारे-वसुधा बोडारे, राजेंद्र सिंग भुल्लर-चरणजित कौर भुल्लर, अशा पती-पत्नीच्या जोड्यांशिवाय विकास पाटील-आकाश पाटील (भाऊ), स्वप्नील बागुल-पुष्पा बागुल, लिलाबाई अशान-अरुण अशान (आई-मुलगा) नगरसेवक पदी निवडून आले आहेत. (यापूर्वी अरुण अशान स्वीकृत नगरसेवक आहेत.) शिवसेने व्यतिरिक्त भाजपचे विजय पाटील-मीनाक्षी पाटील, शेरी लुंड-कांचन लुंड, छाया चक्रवर्ती-सुजित चक्रवर्ती (दिर-भावजय) रिपाइंचे भगवान भालेराव-अपेक्षा भालेराव, जीवन इदनानी-आशा इदनानी (पती-पती) नगरसेवक पदी निवडून आले. यात आशा इदनानी या स्वीकृत नगरसेवक आहेत.
शहरात अशा घराणेशाहीची मक्तेदारी निर्माण होऊन वर्षानुवर्षे पक्ष त्यांनाच उमेदवारी देत असल्याचा आरोप होत आहे. घराणेशाहीमुळे बंडखोरीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकून ७८ पैकी सर्वाधिक भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले. यामध्ये कलानी समर्थक नगरसेवकांचा भरणा होता. शिवसेनेचे -२५, साई पक्षाचे-११, राष्ट्रवादी-४, रिपाइं-२ तर काँग्रेस, भारिप, पीआरपी यांचे प्रत्येकी १ नगरसेवक निवडून आले. येवू घातलेल्या महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या ७८ वरून ८९ झाली. वाढलेल्या ११ जागेत इच्छुकांची वर्णी लागेल असे बोलले जाते. मात्र यामध्ये दबंग व घराणेशाहीचे नगरसेवक नातेवाईक, मुले यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
पप्पु कलानी मुळे राष्ट्रवादीचा बोलबाला
गेल्या महापालिका निवडणुकीत ओमी कलानी यांनी भाजपसोबत घरोबा केल्याने, भाजपची सत्ता आली. आता पप्पु कलानी जेल बाहेर असून कलानी कुटुंबाने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने, राष्ट्रवादी पक्षाचा बोलबाला राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.