शिंदेसेनेकडूनही आळवला जातोय ‘एकला चलो’चा सूर; पदाधिकाऱ्यांनी धरला आग्रह; भाजपविरोधी वातावरणनिर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:05 IST2025-10-17T09:04:27+5:302025-10-17T09:05:55+5:30
ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

शिंदेसेनेकडूनही आळवला जातोय ‘एकला चलो’चा सूर; पदाधिकाऱ्यांनी धरला आग्रह; भाजपविरोधी वातावरणनिर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाजपकडून ठाण्यात वारंवार स्वबळाचा नारा दिला जात आहे. आता शिंदेसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. आनंद आश्रम येथे खा. नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री झालेल्या संघटनात्मक बैठकीत ही मागणी करण्यात आली.
बैठकीत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली.
ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. खा. म्हस्के हे गणेश नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार की, महायुतीत लढणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
म्हस्के यांनी काढली समजूत
दोन दिवसांपूर्वी भाजपचे आ. संजय केळकर यांनी ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हीच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे सांगितले होते. . त्यापाठोपाठ ठाणे पालिकेच्या एकूण ३३ प्रभागांतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपने मार्गदर्शन शिबिर आयोजित करून एकप्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या. यावेळी म्हस्के यांनी नाराज माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याची आमची इच्छा आहे. पण, समोरच्यांची इच्छा नसेल तर स्वतंत्रपणे लढण्यासाठीही आम्ही तयार आहोत. राज्यातील महायुतीचे नेते जो निर्णय घेतील, त्याचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे.
नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना