भाजप, आव्हाड यांना शिंदेसेनेचा धक्का

By अजित मांडके | Updated: May 19, 2025 14:10 IST2025-05-19T14:04:45+5:302025-05-19T14:10:59+5:30

शरद पवार गटाचे सात माजी नगरसेवक एका रात्रीत शिंदेसेनेने आपल्या कळपात आणले...

Shinde Sena gives blow to BJP and Awhad | भाजप, आव्हाड यांना शिंदेसेनेचा धक्का

भाजप, आव्हाड यांना शिंदेसेनेचा धक्का

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. शिंदेसेना व भाजपचे  वर्चस्व असलेली पॉकेट्स सर्वश्रुत आहेत. कळव्यात शरद पवार गटाचे वर्चस्व आहे. ज्याला महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे, त्याला कळवा काबीज करण्याखेरीज पर्याय नाही. कळव्याच्या जीवावर महापालिकेवर कमळ फुलविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला शिंदेसेनेने जोरदार धक्का दिला. शरद पवार गटाचे सात माजी नगरसेवक एका रात्रीत शिंदेसेनेने आपल्या कळपात आणले.  

गेली २९ वर्षे ठाणे पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. २०१७ मध्ये  शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. मधल्या काळात राजकीय समीकरणे बदलली आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष दुभंगले. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वरचष्मा ठेवला आहे. शिंदेसेनेकडे ठाण्यात सध्या ६७ पैकी जवळजवळ ६५ माजी नगरसेवकांचे बळ आहे. तसेच इतर पक्षांतून आलेल्या माजी नगरसेवकांमुळे ही संख्या ७८ या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचली आहे. कळव्यातील १८ माजी नगरसेवक आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी बैठका सुरू केल्या होत्या. शिंदे यांनी एका रात्रीत  सात माजी नगरसेवकांना आपल्या तंबूत आणले. 

यापूर्वी वर्तकनगरमधील माजी नगरसेवकाच्या पत्नीच्या पक्षप्रवेशाची तारीख भाजपने निश्चित केली असताना शिंदेसेनेने त्यांना आपल्याकडे वळवले होते. शहरासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे प्रस्थ वाढले आहे, किंबहुना शत-प्रतिशत यश भाजपने मिळवल्यामुळेच त्या पक्षाने पालिका स्वबळावर लढविण्याचा विचार सुरू केला होता. स्वबळावर महापौर निवडून आणण्याचा दावा करणाऱ्या भाजपला नमते घ्यावे लागणार आहे. शिंदेसेना आणि भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणात शरद पवार गटाला धक्का बसला. कळव्यात आता शरद पवार गटाचा एकच माजी नगरसेवक आहे. मुंब्य्रातील आठ माजी नगरसेवक आधीच शिंदेंकडे आले आहेत. मुंब्रा- कळव्यातून आव्हाडांचे वर्चस्व मोडण्यात शिंदेसेनेला यश येत आहे.

भाजपमध्ये एका प्रभागात आठ ते दहा इच्छुक आहेत. शिंदेसेना युतीसाठी आग्रही आहे; पण युती केल्यास अंतर्गत नाराजीचा फटका भाजपला बसेल आणि स्वबळावरील सत्तेचे स्वप्न भंगेल, याची शिंदेसेनेला खात्री असल्यानेच ते महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहेत. ठाण्यात अजित पवार गटाला सोबत घेऊन शिंदेसेनेविरुद्ध, तर पुण्यात शिंदेसेनेला सोबत घेऊन अजित पवार गटाविरुद्ध लढण्याचा डाव भाजप टाकू शकते.
 

Web Title: Shinde Sena gives blow to BJP and Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.