सायबर फसवणुक करणाऱ्या ७ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला शांतीनगर पोलिसांनी केली अटक

By नितीन पंडित | Updated: August 22, 2025 18:12 IST2025-08-22T18:11:47+5:302025-08-22T18:12:51+5:30

गरीब गरजूंच्या बँक खात्यांचा वापर करून सायबर गुन्हे करणाऱ्या आंतर राज्यीय टोळीचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Shantinagar police arrest interstate gang of 7 cyber fraudsters | सायबर फसवणुक करणाऱ्या ७ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला शांतीनगर पोलिसांनी केली अटक

सायबर फसवणुक करणाऱ्या ७ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला शांतीनगर पोलिसांनी केली अटक

नितीन पंडित

भिवंडी:
गरीब गरजूंच्या बँक खात्यांचा वापर करून सायबर गुन्हे करणाऱ्या आंतर राज्यीय टोळीचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये ७ जणांना दक्षिण गोवा वास्को येथून ताब्यात घेत एकूण १० जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

शहरातील अरबाज शेख या पिडीत तरुणास  नोकरी देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट बँकेत खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर नोकरी न लागल्याने त्याने बँकेत जाऊन चौकशी केली असता त्याच्या बँक खात्यात सायबर गुन्ह्यातील पैसे वर्ग केल्याने बँक खाते गोठवल्याचे समजल्याने त्याने शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

या प्रकरणी राम गुप्ता,अली मोमिन,नावेद शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे व शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन कुचेकर,पोलिस दीपक सानप,रोहित इंगळे हे पथक तपास करीत असताना या टोळीचे म्होरके दक्षिण गोवा येथे असल्याचे समजल्यावर या पोलीस पथकाने वास्को येथील सुप्रिम हॉटेल मध्ये कारवाई करीत तेथून आनंद आशोक मेघवानी,वय ३४ वर्षे, रा. नरसिंगपुर,मध्य प्रदेश,भोला प्रदिप यादव,वय २१ वर्षे,रा.कटोरीया,जिल्हा बाका,राज्य बिहार, लालचंद सुनिल मुखीया,वय २५ वर्षे, रा.अलीनगर,जि.दरभंगा,बिहार.गौरव भुवनेश्वर यादव,वय २५ वर्षे,रा.कटोरीया,जि.बाका,बिहार. रोहितकुमार प्रमोद यादव,वय २१ वर्षे, रा.बेरीसाल,जि.बाका,बिहार,राजाकुमार चक्रधर यादव,वय २१ वर्षे,रा.तरगच्छा,जि. बाका, बिहार,सौरभ अशोक शर्मा,वय ४० वर्षे, रा.बसंतपुर, छत्तीसगड यांना अटक करण्यात आलेली आहे.त्यांच्या जवळून ऑनलाईन फसवणुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन लॅपटॉप,३० मोबाईल फोन व ११ इतर खातेदारांचे साधना सहकारी बँक ली. नागपुर येथील बँक खात्याचे पासबुक,एटीएम कार्ड प्रत्येक पासबुक सोबत एक मोबाईल सिमकार्ड असा एकुण ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हे आरोपी गरीब गरजूंना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून बँकेची महत्वाची कागदपत्रे घेऊन लोकांच्या बँक खात्यावर सायबर फसवणुकीचे व गेमिंगचे पैसे वळवून घेत असत.अशा प्रकारे प्रत्येक १५ दिवसांनी आरोपी ठिकाण बदलून सायबर गुन्हे करून वास्तव्य करत असत.नोकरीचे आमिष दाखवून त्यासाठी बँक खाते उघडण्यासाठी कोणी कागदपत्र मागत असल्यास कोणीही कागदपत्र न देता आपली फसवणूक टाळणे गरजेचे आहे.अशी फसवणूक कोणाची झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी यावेळी केले आहे.

Web Title: Shantinagar police arrest interstate gang of 7 cyber fraudsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.