हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट; १४ पीडित महिलांची सुटका
By जितेंद्र कालेकर | Updated: November 6, 2024 22:41 IST2024-11-06T22:41:05+5:302024-11-06T22:41:22+5:30
उल्हासनगरच्या हॉटेलमध्ये कारवाई : दोन लाख ७५ हजारांची रोकडही जप्त

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट; १४ पीडित महिलांची सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उल्हासनगरच्या एका हॉटेलमध्ये काही महिला आणि तरुणींकडून देहविक्रयचा व्यवसाय करणाऱ्या हॉटेलच्या मॅनेजरसह तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. त्यांच्या तावडीतून १४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली आहे.
उल्हासनगरमधील सफायर इन हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांकडून पैशांच्या मोबदल्यात परदेशी मुली आणि महिला यांच्याकडून देहविक्रय केला जात असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपायुक्त पाटील, सहायक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांच्या पथकाने ६ नोव्हेंबर २०२४ रोजी हॉटेल सफायर इन येथे छापा टाकून १४ पीडित महिला तसेच मुलींची सुटका केली.
हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांकडून पैसे स्वीकारुन त्या बदल्यात मुलींना देह विक्रयासाठी पुरविण्यात येत असल्याचे आढळले. या कारवाईत एक मॅनेजर, दोन वेटर आणि २३ गिऱ्हाईकांविरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुटका केलेल्या पीडित महिला या बांगलादेश किंवा परदेशी नागरिक आहेत किंवा कसे? याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.