सेनेच्या इनकमिंगने बसणार धक्का
By Admin | Updated: April 24, 2017 02:26 IST2017-04-24T02:26:58+5:302017-04-24T02:26:58+5:30
भिवंडी महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दोन दिवसात अर्जांचे वाटप सुरू होणार आहे

सेनेच्या इनकमिंगने बसणार धक्का
रोहिदास पाटील / अनगाव
भिवंडी महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दोन दिवसात अर्जांचे वाटप सुरू होणार आहे. त्याचवेळी शिवसेनेत दणदणीत इनकमिंग होणार असल्याने ते अन्य पक्षांसाठी धक्कातंत्र असेल, असा दावा आमदार रूपेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
प्रभागानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. सर्वच पक्षातील आजी- माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. भिवंडीचा विकास ज्या पध्दतीने होणे आवश्यक होते तो लोकप्रतिनिधी व प्रशासनास करता आला नाही. परिणामी शहर बकाल झाले. नागरी सुविधा सुटलेल्या नाहीत, रस्त्यांची दुरवस्था आहे. रस्ता रूंदीकरणातील बाधितांच्या पुर्नवसनाच्या योजनाच नसल्याने रस्ते रूंद होऊ शकले नाही याकडेही म्हात्रे यांनी लक्ष वेधले. भिवंडीतही क्लस्टर योजना लागू करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. कचऱ्याची समस्या गंभीर आहे. कचरा टाकण्यासाठी दापोडा चाविद्रा येथील डम्पिंगला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. नागरी सुविधा सोडवण्यासाठी शिवसेना आग्रही राहणार असून शहराचा सर्वांगिण विकास हाच निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल असे म्हात्रे म्हणाले.
अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर सेनेचा महापौर झाला. शिवसेनेने आपल्यापरीने विकासकामे केली असा दावा केला.