Sena's Radha in Mira-Bhainder Municipality, BJP corporators shocked | मीरा-भार्इंदर पालिकेत सेनेचा राडा,भाजप नगरसेवकांना धक्काबुक्की

मीरा-भार्इंदर पालिकेत सेनेचा राडा,भाजप नगरसेवकांना धक्काबुक्की

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाच्या कामाची निविदा पुन्हा डावलल्याने शिवसेनेचे नगरसेवक तथा कार्यकर्त्यांनी स्थायी समिती सभागृहासह महापौर दालन आणि आयुक्त कार्यालयात तोडफोड केली. यावेळी भाजप नगरसेवकांना धक्काबुक्कीही करण्यात आली. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिकांनी यावेळी अर्वाच्च शिव्याही दिल्या. भार्इंदर पोलीस ठाण्यात याप्रकरणी शिवसनेच्या १७ नगरसेवकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कलादालनाच्या मुद्यावर शिवसेनेकडून गेली दोन वर्षे पाठपुरावा सुरु होता. काहीवेळा या कामाबाबत निधीच्या कमतरतेचा मुद्दा पुढे करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. मेहतांशी चर्चा करून निधी कमी पडल्यास मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे म्हटले होते. आयुक्तांशीदेखील चर्चा झाल्याने प्रशासनाने पत्र व गोषवारा दिला होता. पण भाजपने बाळासाहेब कलादालनाची निविदा मंजूर न करण्याचा पवित्रा कायम ठेवला. दरम्यान, मंगळवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्याआधीपासून शिवसेना नगरसेवक स्थायी समिती सभागृहात थांबले. भाजपचे सदस्य आले असता, आधी बैठकीत बाळासाहेबांच्या कलादालनाचा प्रस्ताव का नाही घेतला, असा सवाल करत, तो आधी घेण्याची मागणी त्यांनी केली. परंतु भाजप नगरसेवकांनी त्यास नकार दिला. त्यावरून बोलाचाली वाढल्या.
निधीचा मुद्दा भाजपने काढला असता, सेनेसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी बाळासाहेबांसाठी आपला प्रभाग समितीचा निधी देण्याची तयारी दाखवली. परंतु भाजपने विरोध करत सभा तहकूब करण्याचा ठराव केला. भाजपची सदस्य संख्या कमी असल्याने सेनेच्या अनिता पाटील यांनी गैरहजर राहत, भाजपला एकप्रकारे सहकार्यच केले.
भाजपने बाळेसाहेबांचा प्रस्ताव घेण्यास नकार दिल्याने शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी करत खुर्च्या उचलून फेकण्यास सुरुवात केली. सभागृहातील गोंधळ व आरडाओरड ऐकून बाहेर थांबलेले शिवसैनिक तसेच व्यास यांचे कार्यकर्ते सभागृहात गेले. तेथे खुर्च्या फेकणाऱ्या सेनेच्या नगरसेवकांना भाजप नगरसेवकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर सेनेचे नगरसेवक, शिवसैनिक महापौर दालनात गेले. या दालनाच्या काचा फोडून संगणक आदी साहित्य खाली फेकून दिले. दुसºया मजल्यावर बाहेर बसण्याचे बाकडे उलटवून फेकले. त्यानंतर सेनेचे नगरसेवक आयुक्तांच्या दालनात शिरले. बाहेरच भेटलेल्या उपायुक्त डॉ. संभाजी पानट्टे यांना त्यांनी अडवले. आयुक्त दालनात नसल्याने बाहेरची खुर्ची फेकत कर्मचाºयाच्या टेबलवरील फोन, कागद फेकून दिले. महापौर दालनाबाहेर जमून त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
आ. नरेंद्र मेहता हे शिवसेनाप्रमुखांचे द्वेष्टे असून, ते सतत बाळासाहेबांच्या कलादालनाचे काम वेगवेगळ्या मार्गाने रखडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मीरा-भार्इंदर वाचवायचे असेल तर, मेहतांसारख्या लूटमार करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, अशी टीका करत त्यांनी अर्वाच्च शिवीगाळ केली. काही वेळातच पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यावेळीही शिवसैनिकांच्या घोषणा सुरूच होत्या. बºयाचवेळाने शिवसैनिक निघून गेले. त्यानंतर पालिका आयुक्त बालाजी खतगावकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी तोडफोडीची पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, सचिवांना याप्रकरणी फिर्याद देण्यास सांगितले असून, हा प्रकार राजकीय वादातून घडला आहे.
.उद्धव ठाकरेंचे संस्कारच या शिवसैनिकांना नाहीत. आज महापौरांच्या दालनात जाऊन शिवीगाळ केली, ते सहन करण्यासारखे नाही. याप्रकरणी आधी आ. सरनाईक व शिवसैनिकांनी माफी मागावी. युतीचे काय ते मग पाहू. पालिकेतील तोडफोडीची नुकसानभरपाई शिवसेनेकडून घेण्यात यावी. मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांकडे याप्रकरणी तक्रार करणार असून, आरोपींना अटक केली नाही तर रस्त्यावर उतरू. - नरेंद्र मेहता, आमदार, भाजप

Web Title: Sena's Radha in Mira-Bhainder Municipality, BJP corporators shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.