मोरेश्वर येरम

''पैसेसे सब खरीद सकते है सर, लेकिन कला पैसेसे नही खरदी जाती. इश्वर की कृपा से मुझे कला मिली है. उसका सही इस्तेमाल करने का प्रयास कर रहा हूँ", हे वाक्य आहे ठाण्यात एका सोसायटीत सिक्यूरिटी गार्डची नोकरी करणाऱ्या विजय प्रकाश याचं. विजय प्रकाशच्या हातात नेहमी पेन्सिल असायची पण आर्थिक चणचणीमुळे त्याला हातात सिक्यूरिटी गार्डची काठी घ्यावी लागली आहे. गेल्या महिन्याभरापासून तो सिक्यूरिटी गार्डची नोकरी करतोय आणि फावल्या वेळेत आपल्यातील कला जोपासण्याचेही काम करतो आहे. सिनेमेटोग्राफर होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या विजय प्रकाशच्या प्रवासाची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. 

विजय प्रकाश हा मूळचा उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरचा आहे. अलहाबाद विद्यापीठातून त्याने फाइनआर्टमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तो उत्तम चित्रकार तर आहेच पण त्याचा ग्राफीक डिझाइन, फोटोशॉपमध्येही हातखंडा आहे. वडील शेतकरी आणि आई देखील घर सांभाळून शेतीत मदत करते. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याने मुंबईला यायचे ठरवले आणि अवघ्या दोन जोड कपड्यांसोबत उराशी स्वप्नांचे गाठोडे बांधून तो मायानगरीत पोहोचला. ग्राफीक डिझाइन आणि फोटोशॉप येत असल्याने फिल्मसिटीमध्ये काही काम मिळतय का यासाठी प्रयत्न केले. पण कोरोना काळात सारं ठप्प असल्याने त्याला काही काम मिळू शकले नाही.

मुंबईत राहायचे म्हटले तर हातात काहीतरी काम हवे यासाठी ठाण्यातील एका मित्राशी संपर्क साधून पाहिला. त्याने विजयला बोलावून घेतले आणि तो ठाण्यात त्याच्या घरी पोहोचला. मित्राने सिक्यूरिटी गार्डची नोकरी करशील का म्हणून विचारलं आणि विजय प्रकाशने तातडीने होकार कळवला. अलहाबाद विद्यापीठाच्या प्राध्यपकांनी त्याची कला पाहून 'एफटीआयआय'मध्ये पुढचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी आता तो प्रयत्न करतोय. सिक्यूरिटी गार्डची नाइटशिफ्टची नोकरी केली तर रात्री स्वत:साठी फावला वेळही मिळेल आणि अभ्यासही करता येईल या हेतूने त्याने ही नोकरी स्विकारली. 

ठाण्याच्या कोलशेत रोड येथील लोधा अमरा सोसायटीत तो सध्या सिक्यूरिटी गार्ड म्हणून नोकरी करतो आहे. नोकरी करताना रात्री फावल्या वेळेत हातात पेन्सिल घेऊन तो रेखाटन करतो आणि एफटीआयआयच्या प्रवेश परीक्षेसाठी देखील तो तयारी करतोय. सोसायटीतील एका रहिवाशाने विजय प्रकाशने रेखाटलेली चित्र पाहिली आणि त्याने विजयची कला सर्वांपर्यंत पोहोचायला हवी या हेतूने त्याने रेखाटलेले उद्योगपती रतन टाटा यांचे रेखाचित्र व्हायरल करत मदतीचे आवाहन केले.

विजय प्रकाशला आज अनेक जण स्वत:हून संपर्क साधून त्याच्या कलेचे कौतुक करत आहेत. त्याच्याकडून चित्र रेखाटून घेत आहेत आणि त्याचा मोबदला ही देऊ करत आहेत. 'एफटीआयआय'च्या फॉर्मसाठी लागणारे पैसे आता त्याने जमवले आहेत आणि प्रवेश मिळाला तर पुढील शिक्षणासाठी लागणारे पैसे जमा करण्यासाठी तो नोकरी करतोय. 

विजय प्रकाशला येत्या १० डिसेंबरला त्याच्या नोकरीचा पहिला पगार हाती मिळणार आहे. सोसायटीतील लोकांनी त्याच्या कलेला इतरांपर्यंत पोहोचवल्यामुळे त्याला आता हाती चार पैसेही मिळू लागलेत. कष्टाने कमावलेल्या पैशाचे मोल खूप अधिक असते, असे तो नम्रपणे सांगतो.  

"मी एक कलाकार आहे. मला रेखाटन करायला आवडतं. आजूबाजूला काही पाहिलं की मला हातात पेन्सिल घेतल्याशिवाय राहवत नाही. फाइनआर्टची माहिती मिळाली तसं मी त्याचं शिक्षण घेतलं. शिक्षणामुळे कलेच्या अधिक जवळ पोहोचू शकलो. पेन्टिंग हे असं माध्यम आहे की ज्यात जीवन आहे. कलाकाराला एकवेळ पैसे कमी मिळाले तरी चालतील पण त्याच्या कलेचा सन्मान व्हायला हवा. सन्मानानेच कला जिवंत राहू शकते"
- विजय प्रकाश

(वरील सर्व चित्र विजय प्रकाश यांनी रेखाटली आहेत)

Web Title: security guard who came to Mumbai with the dream of becoming a cinematographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.