‘केडीएमसी’त कोरोनाची दुसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:05 AM2020-09-21T00:05:05+5:302020-09-21T00:06:38+5:30

नागरिकांचा निष्काळजीपणा : १९ दिवसांत आढळले नऊ हजार २८६ नवे रुग्ण

The second wave of corona in KDMC? | ‘केडीएमसी’त कोरोनाची दुसरी लाट?

‘केडीएमसी’त कोरोनाची दुसरी लाट?

Next


प्रशांत माने।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसाला ५०० हून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. शनिवारपर्यंतचा आढावा घेता सप्टेंबर महिन्यातील या १९ दिवसांमध्ये तब्बल नऊ हजार २८६ जण बाधित झाल्याचे समोर आले आहे. दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाच्या वाढलेल्या संक्रमणाला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचेही बोलले जात आहे.
केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. १४ मार्च ते ८ जून या लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनलॉकमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहे. आजच्याघडीला ही संख्या शनिवापर्यंत तब्बल ३८ हजार ३०१ पर्यंत पोहोचली असून यातील ७६२ जण मृत पावले. ३२ हजार ८८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले असले तरी सप्टेंबरमध्ये रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० हून अधिक आहे. सुरुवातीला रोज दोन ते चार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. परंतु, अनलॉकनंतर रोज सरासरी ९ ते ११ दरम्यान मृत्यू होत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मृत पावणाºया रुग्णांची संख्या पाच ते सहावर आली आहे. मार्चपासून आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण जुलै महिन्यात आढळले. १ ते ३१ जुलैदरम्यान १३ हजार ३९२ रुग्णांची नोंद झाली. १२ जुलैला एका दिवसात तब्बल ६६१ रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये रुग्ण आढळले याचा विचार करता जुलै महिन्यातील संख्या ओलांडण्याची दाट शक्यता आहे.

तरुणांकडून नियमांचे उल्लंघन
वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता हॉटस्पॉट क्षेत्र पुन्हा सील करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. केडीएमसी क्षेत्रात सद्य:स्थितीला ४४ हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट क्षेत्रात बाहेरील व्यक्तींना येजा करण्यास बंदी असून केवळ अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. अनलॉकमध्ये बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक केले आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केडीएमसीकडून सुरू आहे. परंतु, तरुणांकडून उल्लंघन होत आहे.

ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, ते पाहता कोरोनाच्या दुसºया लाटेला सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. या एकूणच परिस्थितीला नागरिकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत आहे. राज्य सरकार असो अथवा स्थानिक प्रशासन त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका अहोरात्र काम करीत आहेत. परंतु, अनलॉकमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक करत नाही.
- डॉ. प्रशांत पाटील, सचिव, कल्याण आयएमए

Web Title: The second wave of corona in KDMC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.