ठाणे : आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असणारा ब्रुनो हा श्वान तब्बल दहा दिवसांनी कोळी कुटुंबीयांच्या घरी परतला. १९ जून रोजी तो भरकटत दिघा येथे पोहोचला होता. एका ज्येष्ठ दाम्पत्याला सापडल्यावर त्यांनी ब्रुनोला आसरा दिला. पशुपक्ष्यांचे डॉक्टर सुहास राणे यांना ब्रुनोची माहिती मिळताच त्यांनी कोळी कुटुंबाशी संपर्क साधून त्याची भेट घडवून दिली.
विटावा येथील कोळी कुटुंबाने ब्रुनो या श्वानाचे लहानपणापासून पालकत्व स्वीकारले होते. १९ जून रोजी रात्री ब्रुनो बाहेर असताना तो अचानक तिथून गायब झाला. रविवारी सकाळी कोळी कुटुंबीयांना ब्रुनो नसल्याची घटना समजताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. ठाणे, नवी मुंबई येथील विविध प्राणी उपचार केंद्र येथे जाऊन पाहिले तरी तो सापडत नव्हता. त्यानंतर अक्षय कोळी याने ब्रुनो हरवल्याची माहिती सोशल मीडियावर टाकली आणि डॉ. राणे यांनादेखील सर्व हकीकत सांगितली. रविवरपर्यंत कोळी कुटुंबाच्या पदरी निराशाच पडत होती. शेवटी दिघा येथील एका ज्येष्ठ दाम्पत्याचा घरी ब्रुनो असल्याचे राणे यांनी पाहिले. ब्रुनोला दुखापत झाल्याने त्या दाम्पत्याने त्यांना पाचारण केले होते. उपचार करीत असतानाच ब्रूनोची ओळख त्यांना पटली आणि त्यांनी तातडीने अक्षयला कळविले. ब्रुनो सापडल्याची खबर मिळताच अक्षयने तत्काळ दाम्पत्याचा घरी धाव घेतली आणि त्या आजी-आजोबांच्या पाया पडून आभार मानले. अक्षयला पाहताच ब्रुनोने त्याच्या अंगावर झेप घेतली.
आमच्या नातीला प्राण्यांची आवड आहे आणि तिने ब्रुनोला आमच्या सोसायटीमध्ये पाहिले. एक दोन दिवस त्याचे निरीक्षण केल्यावर त्याला घरात घेतले. त्यावेळी त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समजले. मग आम्ही डॉ. राणे यांना उपचारासाठी बोलवल्याची माहिती त्या दाम्पत्याने दिली.
--------