ठाणे : सोशल डिस्टन्सिंग, विनामास्क आणि सॅनिटायझर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करून शहरातील पाच बारसह एक वाइन शॉप सील केले.
या कारवाईअंतर्गत वागळे प्रभाग समितीमधील धमाल बार अँड रेस्टॉरंट सहायक आयुक्त विजयकुमार जाधव यांनी, तर वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत सूरसंगीत बार अँड रेस्टॉरंट, स्वागत बार अँड रेस्टॉरंट आणि नक्षत्र बार अँड रेस्टॉरंट हे तीन बार आणि रेस्टॉरंटस् सहायक बाळासाहेब चव्हाण यांनी सील केले. मुंब्रा प्रभाग समितीमधील एक रेस्टॉरंट सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी सील केले, तर लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीमधील पांडुरंग वाइन शॉपवर सहायक आयुक्त कल्पित पिंपळे यांनी कारवाई केली.