अपहरण करण्याची धमकी देऊन ४ लाखांच्या खंडणीची मागणी, स्कूल बस मालकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 20:41 IST2025-10-27T20:40:35+5:302025-10-27T20:41:37+5:30
मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सोमवारी काशिमीरा पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन ह्या गुन्ह्या बाबत माहिती दिली.

अपहरण करण्याची धमकी देऊन ४ लाखांच्या खंडणीची मागणी, स्कूल बस मालकास अटक
मीरारोड- शाळकरी विद्यार्थ्याच्या अपहरणाची धमकी देऊन त्याच्या आई कडे ४ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या स्कुलबस मालकास काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आणखी काही पालकाना खंडणी साठी धमकावल्याचे समोर आले आहे.
मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सोमवारी काशिमीरा पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन ह्या गुन्ह्या बाबत माहिती दिली. यावेळी सहायक आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे, तपास करणारे उपनिरीक्षक राजेश किणी व शिवाजी खाडे सह राहुल सोनकांबळे, राजेंद्र सुर्यवंशी, राहुल पंडागळे, मुकेश कांबळे, जयप्रकाश जाधव असे तपास पथक उपस्थित होते.
मीरारोडच्या काशिगाव येथील सेंट जेरॉम शाळेत ९ वी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षाच्या मुलाच्या आईने २४ ऑक्टोबर रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली. तिला व्हॉट्सअप संदेश आला व त्यात तुमच्या मुलाचे अपहरण केले जाईल अशी धमकी देत ४ लाख रुपयांची मागणी केली होती. वारंवार संदेश करतानाच मुलाचे छायाचित्र सुद्धा पाठवले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तपास सुरु करत व्हॉट्सअप क्रमांकाची माहिती मिळवून तो क्रमांक ज्याच्या नावे होता त्याला ताब्यात घेतले. बिगारी काम करणाऱ्या त्या व्यक्तीने आपला तो नंबर बंद झाल्याने तो वापरत नाही असे सांगितले. पोलिसांनी मुलाच्या आई कडे पुन्हा माहिती घेतली असता खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने त्यांना पाठवलेले मुलाचे छायाचित्र हे त्यांनी मुलास शाळेत सोडणाऱ्या स्कुल बस चालकास दिले होते अशी माहिती दिली.
पोलिसांनी लागलीच स्कूल बस चालक सदानंद बाबुराव पत्री ( वय ३७ वर्ष ) रा. हरिराम सोसा. हनुमान मंदिरा जवळ, महाजनवाडी, मिरारोड ह्याला चौकशी साठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्या नंतर पत्री ह्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्री ह्याच्या इको, विंगर, फोर्सच्याएकूण ३ लहान गाड्या असून त्यातून तो महामार्ग परिसरातील सेंट जेरॉम शाळा, मदर मेरी शाळा मधील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी खाजगी तत्वावर स्कुल व्हेन चालवतो. एक गाडी तो स्वतः चालवतो तर एक त्याचा भाचा आणि एकावर चालक ठेवला आहे. शाळा सुरु झाल्यावर व्हॅन मधून विध्यार्थी नियमित ने - आण अनुषंगाने तो पालकां कडून त्यांचा क्रमांक व विद्यार्थीचे छायाचित्र घेत असतो.
या शिवाय त्याचे महामार्गवर महाजनवाडी येथे मोबाईल सिम, रिचार्ज व दुरुस्तीचे दुकान आहे. त्या दुकानात एक बिगारी रिचार्ज साठी आला असता पत्री ह्याने त्याच्या अज्ञानतेचा गैरफायदा घेत त्याला सिमकार्ड बंद झाल्याचे सांगत ते चलाखीने स्वतः कडे काढून घेतले आणि दुसरे बंद झालेले कार्ड मोबाईल मध्ये टाकून दिले होते. त्या बिगारीचे सिमकार्ड वापरून पत्री ह्याने व्हॉट्सअप द्वारे पालकांना मॅसेज करून धमकी देत खंडणीची मागणी सुरु केली होती. सदर तक्रारदार महिले कडे त्याने ४ लाखांची मागणी केली होती.
न्यायालयाने त्याला मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक राजेश किणी करत आहेत. पत्री याने आणखी काही विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हॉट्सअप द्वारे मॅसेज करून अपहरणाची धमकी देत पैश्यांची मागणी केली असल्याचे समोर आले आहे. एक पालक कडून ५ लाखांची मागणी करत ३ लाख वर मांडवली केली. एका पालक महिलेस तर तिच्या पतीला उचलून नेले जाणार असल्याचे घाबरवून ५० लाख रुपयांची मागणी केली होती.