स्मृतिस्तंभातून उलगडणार सावरकरांचा इतिहास; गडकरी रंगायतनमध्ये आज उद्घाटन होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 00:29 IST2019-09-11T00:29:21+5:302019-09-11T00:29:50+5:30
अंदमानच्या कारागृहातील स्वतंत्र भारताचे कृतिशील स्वप्न पाहणारे सावरकर, तेथील जेलमधील त्यांची अवस्था, मनातील चलबिचल असाह्यता, त्यातून निर्माण झालेले काव्य हेच दृश्य या स्मृतिस्तंभातून मांडले आहे.

स्मृतिस्तंभातून उलगडणार सावरकरांचा इतिहास; गडकरी रंगायतनमध्ये आज उद्घाटन होणार
ठाणे : ठाण्यात साकारलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिस्तंभातून त्यांच्या लढ्याचा इतिहास उलगडणार आहे. अंदमानच्या काळकोठडीचे चित्र व पुढे पाण्यात निखळून पडलेली खिडकीची चौकट व त्याही पुढे जाऊन कोलमडून पडलेला ब्रिटिश सत्तेचा पिंजरा व त्यातून बाहेर पडणारे स्वातंत्र्यप्रेमी पक्षी म्हणजेच स्वातंत्र्यासाठी तळमळणारे भारतीय. त्याला जोड दिली आहे समर्पक प्रकाश आणि ध्वनीची. असा सुंंदर बगीचा तयार करून स्वातंत्र्याचा इतिहास सांगणारा विशाल चित्रपट साकारण्यात आला आहे.
अंदमानच्या कारागृहातील स्वतंत्र भारताचे कृतिशील स्वप्न पाहणारे सावरकर, तेथील जेलमधील त्यांची अवस्था, मनातील चलबिचल असाह्यता, त्यातून निर्माण झालेले काव्य हेच दृश्य या स्मृतिस्तंभातून मांडले आहे. ठाणे महापालिकेद्वारे उभारलेल्या या स्मृतस्तंभाचे बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या स्मृतिस्तंभाला ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ असे नाव देण्यात आले आहे. सभागृहनेते नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मृतिस्तंभ ठाणे शहराचा मानबिंदू असलेल्या गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वाराजवळ ६० चौरस फुटांच्या आवारात उभारण्यात आले आहे. या स्मृतिस्तंभाची निमिर्ती आंतरराष्ट्रीय पुरस्कारविजेते सुनील चौधरी यांनी केली आहे. सावरकर यांचे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हे सागराला आवाहन करणारे त्यांचे गीत स्मृतिस्तंभात चित्रबद्ध केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर नाटककारही होते. त्यामुळे गडकरी रंगायतनच्या आवारात स्मृतिस्तंभ उभारण्याचा निर्णय घेतल्याचे म्हस्के यांनी सांगितले. दोन-तीन महिन्यांपासून या स्मृतिस्तंभाचे काम सुरू होते. विशेष म्हणजे येथे सावरकर यांच्या ‘कमला’ कवितेतील झाडांचीही निमिर्ती केली आहे. या ठिकाणी एक स्तंभ उभारला असून त्यावर ज्योत आहे. ठाणे महापालिकेद्वारे उभारलेला हा स्मृतिस्तंभ ठाणेकरांसाठी प्रेरणास्थान ठरेल अशी प्रतिक्रिया सावरकरप्रेमींनी व्यक्त केली आहे.