‘समृद्धी’ला भिवंडीतूनही विरोध
By Admin | Updated: October 13, 2016 03:40 IST2016-10-13T03:40:04+5:302016-10-13T03:40:04+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास शहापूरपाठोपाठ भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही विरोध करण्यास सुरुवात केली

‘समृद्धी’ला भिवंडीतूनही विरोध
भिवंडी : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास शहापूरपाठोपाठ भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पिसे चिराडपाडा येथे उपजिल्हाधिकारी रेवती गायकर आल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्या समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने त्यांना बैठक आटोपती घ्यावी लागली.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांच्या भागीदारीतून उभा करण्याचे गाजर सरकारकडून दाखवले जात आहे. सरकारच्या भूलथापांना बळी न पडण्याच्या पवित्र्यात स्थानिक शेतकरी आहे. पिसे चिराडपाडा येथील शेतकऱ्यांच्या सुमारे १०० एकर शेतजमिनी संपादित केल्या जाणार असून येथील शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी गायकर या पिसे चिराडपाडा येथे आल्या होत्या. या प्रसंगी भिवंडी तहसीलदार वैशाली लंभाते, मंडळ अधिकारी चंद्रकांत राजपूत उपस्थित होते. हा महामार्ग भिवंडी तालुक्यातील उसरोळी, वडपे, बोरिवली, आमणे, पिसे चिराडपाडा या पाच महसुली गावांतून जाणार आहे. याकरिता, शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करायच्या आहेत. परंतु, या परिसरातून मुंबई-नाशिक महामार्ग, गॅस पाइपलाइन, वडोदरा-जेएनपीटी महामार्ग, उच्चदाबाच्या वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहक तारांचे टॉवर तसेच मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीसाठी पिसे येथील हजारो एकर शेतजमीन सरकारने संपादित करून येथील शेतकऱ्यांना भूमिहीन केले. पण, शेतकऱ्यांना योग्य मोबदला सरकारने व संबंधितांनी दिला नाही. तसेच नोकरीही दिली नाही. (प्रतिनिधी)