भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री ; त्रिकुटावर गुन्हा दाखल,एकास अटक
By नितीन पंडित | Updated: March 22, 2024 15:17 IST2024-03-22T15:17:11+5:302024-03-22T15:17:54+5:30
पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून मिसबा उल फैजुल हक यास अटक केली आहे.

भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री ; त्रिकुटावर गुन्हा दाखल,एकास अटक
नितीन पंडित
भिवंडी: शहरात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहचू शकते या बाबत अनेक तक्रारी समोर आल्या नंतर अन्न निरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश पटेल,मिसबा उल फेजुल हक व सोनू यांनी एकता चौक,खाडीपार खोणी येथे चेडार चिज,डेरीमिल्क कॅडबरी चॉकलेट, खाण्याचे सॉसेस,बिस्कीटे,विनेगर असे परकीय भाषेत मजकूर लिहलेले अन्न पदार्थ मुदतबाह्य व खाण्यास अयोग्य तसेच मानवी शरीरास अपायकारक असल्याचे माहीती असुन ही विक्रीकरीता ठेवले होते.विशेष म्हणजे खाद्यपदार्थाच्या आवरणावरील मुळ लेबल मध्ये छेडछाड करून ठेवल्याचे आढळून आल्याने ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरूणा जगन्नाथ वीरकायदे यांनी दिलेल्या तक्रारी वरून निजामपूरा पोलिस ठाण्यात फसवणुकी सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून मिसबा उल फैजुल हक यास अटक केली आहे.