A salary category of 64 fraudulent teachers has been permanently suspended | फसवणूक करणाऱ्या ६४ शिक्षकांची एक वेतनश्रेणी कायमची स्थगित

फसवणूक करणाऱ्या ६४ शिक्षकांची एक वेतनश्रेणी कायमची स्थगित

- सुरेश लोखंडे

ठाणे : आॅनलाइन बदल्यांमध्ये बहुतांशी प्राथमिक शिक्षकांनी दिशाभूल करणारी चुकीची व खोट्या माहितीसह बनावट वैद्यकीय दाखले देऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या सोयीच्या शाळा प्राप्त केल्या. याची गंभीर दखल घेऊन २१७ शिक्षकांची चौकशी केली जात आहे. यापैकी सध्या पहिल्या टप्प्यात ६४ शिक्षकांनी पतीपत्नी एकत्रिकीकरणाºया सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे त्यांची एक वेतनश्रेणी कायमची स्थगित करून त्यांच्यावर या कठोर कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे. उर्वरित संवर्ग-१ चा लाभ घेणाºया शिक्षकांच्या चौकशीचे काम मात्र जोरदारपणे सुरू आहे. राज्यात प्रथमच एवढी मोठी कार्यवाही झाल्याचे सांगितले जात आहे.
सोयीच्या बदलीसाठी शिक्षकांकडून प्रशासनाची फसवणूक ही लांच्छनास्पद बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा परिषदेने जोरदार चक्रे फिरवली. आॅनलाइन बदल्यांसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या ‘विनाशकाली विपरित बुद्धी’चा वापर करून बदल्यांमधील सवलतीचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. एकाच वेळी ६४ शिक्षकांची एक वेतनश्रेणी कायमची बंद करण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली आहे. या शिक्षकांमुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. पती-पत्नी एकत्रिकीकरणाखाली शिक्षकांना जवळची शाळा मिळणे शक्य आहे. पण, या शिक्षकांनी चुकीची माहिती देऊन सवलतीचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
या आॅनलाइन बदल्यांमध्ये संवर्ग-२ म्हणजे पती-पत्नी एकत्रिकीकरणाचा लाभ शिक्षक, शिक्षिकांना घेता येत आहे. यासाठी शाळेचे मुख्यालय व शाळा यांच्यातील अंतर ३० किमी असणे अपेक्षित आहे. तरच, पती-पत्नी एकत्रिकीकरणाचा लाभ शिक्षकांना मिळत आहे. पण, या सवलतीचा लाभ घेणाºया शिक्षक, शिक्षिकांनी मुख्यालयापासून शाळा जवळ असूनही तिचे ३० किमी अंतर दाखवण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे तब्बल ६४ शिक्षकांना एक वेतनश्रेणी कायमची स्थगितीला तोंड द्यावे लागले आहे.
शिक्षकांनी चुकीची माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक केल्यामुळे आणि यापुढे असे करण्याची कोणीही हिम्मत करू नये, यासाठी एक वेतनश्रेणी कायमस्वरूपी थांबवण्याची शिक्षा या शिक्षकांना दिल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.

१५३ शिक्षकांची चौकशी सुरूच
संवर्ग-२ च्या कारवाईनंतर संवर्ग-१ च्या सवलतींचा लाभ घेणाऱ्यांमध्ये १५३ शिक्षकांचीदेखील चौकशी सुरू आहे. त्यांनी जोडलेले वैद्यकीय दाखले बनावट आहे की काय, यासाठी दाखल्यांची चौकशी संबंधित रुग्णालयांमध्ये सुरू आहे.
यामध्ये ठाणे सिव्हिल रुग्णालयातील सर्वाधिक १०२ वैद्यकीय दाखल्यांचा समावेश आहे. उर्वरित जेजे, सायन्स रुग्णालयांमधील दाखले आहेत. या रुग्णालयांचे अहवाल प्राप्त होताच या संवर्ग-१ च्या शिक्षकांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

सर्वाधिक शिक्षक कल्याण तालुक्यातील
जिल्ह्यातील या ६४ शिक्षकांची एक वेतनश्रेणी रद्द केल्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जारी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याण तालुक्यातील २२ शिक्षकांना या शिक्षेस पात्र ठरवण्यात आले आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील १८, अंबरनाथ तालुक्यातील १०, मुरबाडमधील नऊ आणि शहापूर तालुक्यातील पाच शिक्षकांना या एक वेतनश्रेणीच्या स्थगितीच्या शिक्षेला तोंड द्यावे लागले आहे.

Web Title: A salary category of 64 fraudulent teachers has been permanently suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.