गोरगरिबांसाठी सागर उटवाल ठरले अन्नदाता; उल्हासनगरात सुरू आहे उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 15:19 IST2021-05-14T15:19:40+5:302021-05-14T15:19:52+5:30
सकाळ, संध्याकाळ ताजे अन्न

गोरगरिबांसाठी सागर उटवाल ठरले अन्नदाता; उल्हासनगरात सुरू आहे उपक्रम
सदानंद नाईक
उल्हासनगर : ऐन कोरोनाकाळात शिवसेना शहर संघटक सागर उटवाल यांच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम टीम शेकडो गरीब-गरजूंची भूक भागवित आहे. बिर्यानी, डाळ-भात, पोळी, खिचडी आदींचे वाटप ही टीम करीत आहे.
उल्हासनगरात संकटकाळी अनेक समाजसेवी संस्था पुढे येत आहेत. यावर्षी कोणताही गाजावाजा न करता समाजसेवी संस्था आपली कामे करीत आहेत. त्यापैकी शिवसेना शहर संघटक व पक्षाचे कल्याण लोकसभा सोशल मीडिया प्रमुख उटवाल हे आहेत. उटवाल यांची टीम हजारो गरिबांना पाकिटातून अन्नाचे वाटप करत आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे घरातील चूल कशी पेटणार अशी चिंता शेकडो नागरिकांना लागली आहे. अशांच्या मदतीला ही टीम धावत आली आहे.
टीममधील राज उटवाल, सुनील सिंह, राहुल तिवारी, राहुल गुदारिया, अमित राजोरीया, साजन मारोठीया, राहुल वर्मा, जोगिंदर सिंग आदींनी एकत्र येत शहराच्या पश्चिम भागातील सी ब्लॉक परिसरातील शेकडो गरीब व गरजू नागरिकांना दोन वेळचे ताजे अन्न देत आहेत. टीमचे सदस्य स्वतः स्वयंपाक करून पाकिटे गरिबांपर्यंत पोहचवतात. टीमला जितके दिवस शक्य आहे तितके दिवस हा उपक्रम राबविणार असल्याचे उटवाल यांनी सांगितले. अशा संकटसमयी समाजसेवी संस्था व दानशूर नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.