प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वस बसथांब्यावरील वीज पुरवठा बंद, परिवहन प्रशासनाने उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 17:17 IST2018-10-10T17:15:36+5:302018-10-10T17:17:31+5:30
ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्यावर उभे असतांना शॉक एकाचा मृत्यु झाल्यानंतर परिवहन प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सर्वच थांब्यावरील वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वस बसथांब्यावरील वीज पुरवठा बंद, परिवहन प्रशासनाने उचलले पाऊल
ठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या खोपट येथील बसथांब्यावर ४० वर्षीय तरुणाचा वीजेचा धक्का लागून मृत्यु झाल्याची बाब शवविच्छेदनानंतर समोर आली आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीकोनातून परिवहन प्रशासनाने सर्वच बस थांब्यावरील जाहीरातीसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या तरुणाच्या मृत्युप्रकरणाचा नौपाडा पोलिसांनी सखोल तपास सुरु केला असून त्यासाठी पोलिसांनी परिवहन प्रशासनाकडून थांब्यावरील जाहीरात ठेक्याची संपुर्ण माहितीचा अहवाल घेतला आहे.
खोपट भागातील टिएमटीच्या थांब्यावर बसची वाट पहात असताना दोस मोहम्मद सलमानी (४०) या तरु णाचा मृत्यु झाल्याची घटना काही नुकतीच घडली होती. ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयात शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यु हा वीजेचा धक्का लागल्यानेच झाल्याचे निष्पन्न झाले. या अहवालानंतर नौपाडा पोलिसांनी याप्रकरणातील दोषींविरोधात कारवाई करण्यासाठी सखोल तपास सुरु केला. या तपासाकरीता नौपाडा पोलिसांनी परिवहन प्रशासनाकडे थांब्यावरील जाहीरात ठेक्याची माहिती एका पत्राद्वारे मागितली होती. तसेच बस थांब्यावर जाहीरात बसविण्याकरिता कोणी पहाणी करून ना हरकत दिला होता, अशी माहितीही मागितली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करायचा असल्यामुळे तत्काळ माहिती देण्याची मागणी पोलिसांनी पत्रात केली होती. पोलिसांच्या पत्रानुसार ठाणे परिवहन प्रशासनाने जाहीरात ठेक्यासंबंधीची सविस्तर माहितीचा अहवाल तयार केला असून हा अहवाल नुकताच नौपाडा पोलिसांना दिला आहे.
दरम्यान, खोपटमधील दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीकोनातून सर्वच बस थांब्यावरील जाहीरातीसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली. या सर्वच थांब्यांची सविस्तर तपासणी केल्यानंतरच हा वीज पुरवठा सुरु ळीत केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.