नाका कामगारांची होरपळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST2021-02-18T05:15:06+5:302021-02-18T05:15:06+5:30
चिकणघर : कोरोनामुळे लाॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनलॉक होईपर्यंत कल्याणमधील कामगार नाके बंद झाल्याने नाका कामगारांची सुरू झालेली होरपळ अजूनही ...

नाका कामगारांची होरपळ सुरूच
चिकणघर : कोरोनामुळे लाॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनलॉक होईपर्यंत कल्याणमधील कामगार नाके बंद झाल्याने नाका कामगारांची सुरू झालेली होरपळ अजूनही कायम आहे. काम नसल्याने बरेच कामगार आपआपल्या गावी गेले होते. मात्र अनलॉक झाल्याने ते पुन्हा परतले. पण कामे बंदच असल्याने होरपळ कायम आहे. यावर उपाय म्हणून काही कामगारांनी भंगार गोळा करणे, भाजीपाला विकायला सुरुवात केली. मात्र भांडवलाअभावी तेही बंद झाले, अशी माहिती नाना सोमवंशी या मजूर ठेकेदाराने दिली.
सध्या कल्याण परिसरात तुरळक बांधकामे सुरू असून त्यांना गती नसल्याने आणखी काही महिने मजुरांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार असल्याचे विजय मिरगीवार या नाका कामगाराने सांगितले. कल्याणमध्ये सध्या खडकपाडा सर्कल आणि शिवाजी चौक असे दोन मोठे कामगार नाके असून रोज सकाळी हे नाके कामगारांनी गजबजलेले असतात. मात्र काम न मिळाल्याने मजुरांना रिकाम्या हाती घरी परतावे लागत आहे. कल्याण शहर आणि परिसरात नव्याने वास्तव्यास येणाऱ्यांचा ओघ वाढत असल्याने मजुरीसाठी परभणी, अकोला, अमरावती, औरंगाबाद, विदर्भासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाहून मजूर येतात.