इतिहासाच्या पराक्रमाचे ‘किल्ले’दार भग्नावस्थेत खडे

By Admin | Updated: March 20, 2017 02:07 IST2017-03-20T02:07:14+5:302017-03-20T02:07:14+5:30

महाराष्ट्राला जशी संतांची परंपरा लाभली आहे, तशी ऐतिहासिकही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच प्रत्येकाच्या अंगात रोमांच

In the ruins of the fort, the history of the fort of history is standing | इतिहासाच्या पराक्रमाचे ‘किल्ले’दार भग्नावस्थेत खडे

इतिहासाच्या पराक्रमाचे ‘किल्ले’दार भग्नावस्थेत खडे

महाराष्ट्राला जशी संतांची परंपरा लाभली आहे, तशी ऐतिहासिकही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच प्रत्येकाच्या अंगात रोमांच उभा राहतो. छाती अभिमानाने फुगते. रक्त सळसळते. राज्यातील किल्ले हे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य आणि मराठ्यांच्या पराक्रमाची आजही साक्ष देतात. प्रत्येक किल्ला मिळवण्यासाठी महाराजांना संघर्ष करावा लागला, युद्धेही झाली. आज हा इतिहास प्रत्येकाने वाचला आहे, शिकला आहे. महाराष्ट्रात सुमारे ५५० च्या वर किल्ले आहेत. ही आपली शान आहे. पण, आज सरकारी अनास्था, पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षतेमुळे आपली मान शरमेने खाली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी एका बाजूला कोट्यवधी खर्च केले जाणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाराजांनी कष्टाने मिळवलेल्या किल्ल्यांची दुरवस्था होत आहे. हे किल्ले जतन करण्यासाठी सरकारने खर्च करावा, असे अभ्यासक वारंवार सांगत आहेत. पण, त्याकडे सरकार लक्ष देतच नाही. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ३५० कोटी मंजूर केले आहेत. पण, याचा योग्य पद्धतीने वापर झाला, तर ते टिकतील. अन्यथा, भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीत हे किल्ले पूर्णत: ढासळतील, यात शंका नाही.
आज कुठल्याही किल्ल्यावर गेल्यास दुरवस्था चटकन नजरेस पडते. जागोजागी अस्वच्छता दिसते. शौर्याचे, अभिमानाचे प्रतीक म्हणून आपण या किल्ल्यांकडे पाहतो. पण, आपण पर्यटक म्हणून जातो आणि तेथे चक्क दारूच्या पार्ट्या करतो, हे आपले शौर्य का? बुरूज ढासळले आहेत, भिंती पडल्या आहेत किंवा पडायला आल्या आहेत. अक्षरश: भग्नावस्थेत त्या इतिहासाची साक्ष देत आहेत. प्रेमीयुगुले येथील दगडांवर आपल्या आठवणींच्या खुणा कोरून जातात.
महाराष्ट्रातील किल्ल्यांची जशी आज अवस्था आहे, तशी भिवंडी तालुक्यातील पाच किल्ल्यांची आहे. मुळात येथे किल्ले आहेत, हेच कुणाला माहीत नाही. सरकारदरबारी तर गुमतारा किल्ला वगळता अन्य चार किल्ल्यांची नोंदच नाही, इतका आनंदीआनंद आहे. तेथील स्थानिकांनाही या किल्ल्यांविषयी फार कल्पना नाही. सरकारी उदासीनतेमुळे बहुतांश किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे असेच सुरू राहिल्यास भावी पिढीला किल्ला म्हणजे काय, हे कदाचित चित्रांतूनच दाखवावे लागेल.
भिवंडीतील गुमतारा हा किल्ला तीर्थक्षेत्र वज्रेश्वरीजवळ असूनही सुविधांपासून वंचित आहे. आलेल्या दुर्गप्रेमींना किल्ल्याच्या स्थानाबद्दल योग्य ती माहिती मिळत नाही. किल्ल्यावर जाणाऱ्या तीन वाटांपैकी दोन वाटा या धोकादायक झाल्या आहेत, तर घोटगावावरून जाणारी वाट सोपी आहे. परंतु, या वाटेबद्दल दुर्गप्रेमींना नीटशी माहिती नाही. ती होण्यासाठी किमान दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. तटबंदी, बुरूज ढासळले आहेत. येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये बारमाही पाणी कसे राहील, याची उपाययोजना केली पाहिजे. किल्ल्याची माहिती, इतिहास याचे फलक किल्ला, वज्रेश्वरीदेवीच्या मंदिर परिसरात लावले पाहिजेत, जेणेकरून येणारे, भाविक, पर्यटकांना या किल्ल्याची माहिती होईल.
पिंपळास किल्ल्याचे फक्त एका टेकडीवर अवशेष उरले आहेत. गावात वस्तीमध्ये हा किल्ला आहे. येथे जाण्यासाठी वाटही शिल्लक राहिलेली नाही. तिन्ही बाजूंनी लोकवस्ती आणि मोठी घरे आहेत. पश्चिमेला खाडीप्रदेश येतो. गावातूनच एका मोठ्या घराच्या मागच्या अंगणातून वाट शोधत किल्ल्यावर जावे लागते. किल्ल्यावर सर्वत्र प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. यावरून, नागरिक मौजमजा करण्यासाठी येतात. याकडे प्रशासन आणि स्थानिकांचे लक्ष जात नाही, ही शोकांतिका आहे.
कांबे किल्ल्याची परिस्थितीही काही वेगळी नाही. मुख्य गावातच नागरी वस्तीमध्ये हा भुईकोट किल्ला आहे. एका मोठ्या घराच्या मागे फक्त या किल्ल्याचा एक बुरूज उरला असून किल्ल्यावर स्थानिकांनी अतिक्र मण करून घरे बांधली आहेत.
कहर म्हणजे ग्रामपंचायतीने तिथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले आहे. सर्वत्र झुडुपे वाढली असून तिथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती, तर हे चित्र उभे राहिले नसते.
फिरंगकोट किल्ला हा गावापासून दूर असून एका टेकडीवर वसला आहे. ती जागा खाजगी मालमत्ता असल्याची माहिती एका ग्रामस्थाने दिली. किल्ल्याच्या आजूबाजूची माती ही स्थानिक वीटभट्टीसाठी नेली जाते. किल्ल्याला मोठमोठ्या झाडांचा विळखा पडला आहे.
खारबाव हा आता किल्ला राहिला नसून तिथे आता सरकारी दवाखाना थाटला आहे. थोडीफार तटबंदी आणि एकमेव बुरूज शिल्लक असून त्या बुरु जाचा उपयोग दवाखान्यातील टाकाऊ सिरिंज, औषधांच्या बाटल्या, सलाइन टाकण्यासाठी होतो.

Web Title: In the ruins of the fort, the history of the fort of history is standing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.