दुर्गाडी नव्या पुलाची मार्गिका आजपासून प्रवाशांना खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:56+5:302021-05-31T04:28:56+5:30
कल्याण : भिवंडी - कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहा पदरी पुलापैकी दोन लेनचे काम पूर्ण ...

दुर्गाडी नव्या पुलाची मार्गिका आजपासून प्रवाशांना खुली
कल्याण : भिवंडी - कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहा पदरी पुलापैकी दोन लेनचे काम पूर्ण झाले आहे. या दोन लेनचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते सोमवारी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. दरम्यान, या लोकार्पणाआधीच शिवसेना, भाजप आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे.
या नव्या पुलामुळे दुर्गाडी पुलावरील वाहतूककोंडी आता संपुष्टात येणार आहे. दरम्यान, पुलाचे काम मार्गी लागल्यावरून राजकीय पक्षांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. शिवसेनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना, तर भाजपने याचे श्रेय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मनसेनेही माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच पुलाच्या दोन लेन प्रवाशांसाठी खुल्या होत असल्याचे म्हटले आहे. पत्रकबाजी आणि सोशल मीडियावरून सुरू असलेले श्रेयाचे राजकारण चर्चेचा विषय ठरले आहे. प्रकाश भोईर यांनी १५ जुलै २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन कल्याण खाडीवर समांतर पूल बनवण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच पुलाच्या लेनचे उद्घाटन शक्य झाल्याची पोस्ट मनसेचे सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. दुर्गाडी नवीन पुलाला साबीर भाई शेख सेतू असे नाव द्यावे. कोनगाव आणि कल्याण ही दोन्ही शहरे त्यांची कर्मभूमी आणि मातृभूमी होती, हे विसरू नये, याकडेही शेख यांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच काम मार्गी लागल्याचे म्हटले आहे. भाजपच्या निवेदनात म्हटले आहे की, खासदार कपिल पाटील यांनी हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये नव्या दुर्गाडी पुलाचाही समावेश होता. दुर्गाडी येथे आणखी सहा पदरी नव्या पुलासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. अरूंद दुर्गाडी पुलामुळे वाहतूककोंडीचा फटका फडणवीस यांनाही बसला होता. त्यामुळे त्यांनी दुर्गाडी पुलाच्या कामाला महत्त्वाचे स्थान दिले होते. कंत्राटदाराने काम रखडविल्यानंतर तातडीने नवा कंत्राटदार नेमण्यासाठीही त्यांनी मान्यता दिली होती. याकडे खासदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
-
फोटो