जांभूळ गावाकडे जाणारा रस्ता अपघातांना ठरतोय कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST2021-07-27T04:42:00+5:302021-07-27T04:42:00+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागातील जांभूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण अर्धवट राहिल्याने हा रस्ता धोकादायक ठरला आहे. या रस्त्यावर ...

जांभूळ गावाकडे जाणारा रस्ता अपघातांना ठरतोय कारणीभूत
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागातील जांभूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण अर्धवट राहिल्याने हा रस्ता धोकादायक ठरला आहे. या रस्त्यावर एकाच दिवशी दोन अपघात झाल्याने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
येथील जांभूळ फाटा ते डेंटल महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता धोकादायक झालाय. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अद्यापही गटर आणि पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्याचा फटका अनेक वाहनचालकांना बसतोय. शनिवारी सकाळी या रस्त्यावरून जाणारा एक डंपर रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उलटला. सुदैवाने शेजारी असलेल्या ट्रान्सफार्मरला धडक न बसल्याने वाहनचालकाचा जीव बचावला, तर याच रस्त्यावर सिमेंटने भरलेला ट्रक मातीत रुतल्याने तो ट्रक बाहेर काढण्यासाठी वाहनमालकाला मोठी कसरत करावी लागली आहे. एकाच दिवशी घडलेल्या दोन अपघातांमुळे या रस्त्याचा दर्जा आणि अर्धवट कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असून, अद्याप ते पूर्ण करण्यात आलेले नाही. या रस्त्यावर अनेक ठिकाणी काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे, तर काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम रखडल्याने हा रस्ता धोकादायक अवस्थेत आहे. येथून अंबरनाथ पालिकेच्या कोविड रुग्णालयाकडे रस्ता जातो. रुग्णांना रुग्णवाहिकेतून याच रस्त्यावरून न्यावे लागत आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णवाहिकेलादेखील या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.