‘पुरात दोरी पकडून रस्ता ओलांडा’, ठामपाचा अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:28 IST2019-05-30T00:28:08+5:302019-05-30T00:28:14+5:30
शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते.

‘पुरात दोरी पकडून रस्ता ओलांडा’, ठामपाचा अजब सल्ला
ठाणे : शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, बुधवारी त्यांनी नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, ७५ टक्केच सफाई झाल्याचे समोर आले. त्यामुळे उर्वरित २५ टक्के कामे केव्हा पूर्ण होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. संतापजनक प्रकार म्हणजे नितीन कंपनी, किसननगर भागात पावसाच्या पुरात रस्ता ओलांडण्यासाठी लोखंडी खांब उभारून त्याला दोरी बांधावी, आणि ती धरून नागरिकांनी रस्ता ओलांडावा, असा अजब सल्ला महापालिकेने दिला आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना ठाण्यात सुरुवात झाली. ही कामे कुठवर आली आहेत, याची पाहणी बुधवारी आयुक्त जयस्वाल यांनी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तीनहातनाका, मॉडेला चेकनाका, किसननगर, साठेनगर, सावरकरनगर, नितीन कंपनी या परिसरात पाहणी केली. त्यानुसार, कामे ७५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत ती समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.
>सफाई कामगारांच्या सुरक्षेची पोलखोल
मान्सूनपूर्वी ठाणे महापालिका हद्दीत नालेसफाईची लगबग सुरू आहे. पावसाचे पाणी सहज आणि पटकन वाहून जावे, यासाठी नाल्यातील गाळ, कचरा काढण्यात येतो. मात्र, नाल्यात उतरून सफाई करणारे कामगार हातमोज्यांऐवजी प्लास्टिक पिशव्या घालून काम करत असल्याचे या सफाई दरम्यान निदर्शनास
आले. तर, काही ठिकाणी कर्मचारी चक्क पोहत असताना आयुक्तांच्या पाहणी दौºयात दिसले. ठेकेदारांकडून सफाई कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे पाहायला मिळाले. ठाणे महापालिकेच्या हद्दीत शहराची स्वच्छता करणारे महापालिकेचे सुमारे ८०० हून अधिक सफाई कामगार काम करतात. पावसाळ्याच्या तोंडावर सध्या या सर्व कर्मचाऱ्यांना गटारांमधील गाळ काढण्याचे काम दिले आहे. ते करताना आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी हातमोजे घालणे बंधनकारक आहे. तसेच काम करताना त्यांना तोंडावर लावण्यासाठी मास्कदेखील नसल्याची गंभीर बाब बुधवारी आयुक्तांच्या दौºयाप्रसंगी माध्यमांच्या लक्षात आली.
>संरक्षक भिंतीअभावी माती पुन्हा नाल्यात
मेट्रोच्या कामामुळे पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीएने स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा ठेवावी, अशा सूचना त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना दिल्या.
तीनहातनाका येथील पनामा कंपनीजवळील नाल्याची सुरुवातीला पाहणी केली. या नाल्यातील कचरा काढण्यात आला आहे. मात्र, या नाल्याभोवती संरक्षक भिंत नसल्याने बाजूची माती नाल्यात पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नाल्यात मातीचा गाळ साचून पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सावरकरनगर आणि साठेनगर भागातील नाल्यात कचºयाचे ढीग असून ते काढण्याचे काम सुरू होते. येथे रोबोट मशीनच्या साहाय्याने कचरा काढण्यात येत होता.