तीन प्रवाशांना घेऊन डोंबिवलीत सर्रास वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:47 PM2020-09-20T23:47:27+5:302020-09-20T23:47:37+5:30

रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून मानपाडा रस्त्यावर जाण्यासाठी पूर्वी शेअरपद्धतीने १८ ते २० रुपये आकारले जायचे. आता मात्र ३० रुपये आकारले जातात.

Riksha travling in Dombivali with three passengers | तीन प्रवाशांना घेऊन डोंबिवलीत सर्रास वाहतूक सुरू

तीन प्रवाशांना घेऊन डोंबिवलीत सर्रास वाहतूक सुरू

googlenewsNext

डोंबिवली : कोरोनाच्या कालावधीत रिक्षा प्रवासासाठी राज्य सरकारने परिवहन विभागामार्फत नियम, अटी घालून व्यवसायाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये रिक्षात शेअरपद्धतीने तीनऐवजी दोन प्रवासी असावेत, ही प्रमुख अट असून तो नियम धाब्यावर बसवून तीन वेळप्रसंगी चार प्रवासी घेऊन रिक्षा प्रवास सुरू असल्याचे डोंबिवलीत निदर्शनास येत आहे.


रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून मानपाडा रस्त्यावर जाण्यासाठी पूर्वी शेअरपद्धतीने १८ ते २० रुपये आकारले जायचे. आता मात्र ३० रुपये आकारले जातात. खरेतर, दोन प्रवासी घेऊन तिसऱ्या सीटचे भाडे विभागून घ्यावे, असे संकेत असतानाही रिक्षाचालक मात्र सर्रासपणे तीन सीट घेऊन तिघांकडून प्रतिप्रवासी ३० रुपये घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड पडत असून आरटीओने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. इंदिरा गांधी चौकातून पलावा येथे जाण्यासाठी पूर्वी २५ ते ३० रुपये घेतले जात होते. आता मात्र तीन प्रवाशांकडून प्रत्येकी ५० रुपये भाडे आकारले जात आहे. रिक्षाचालकांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्या कुटुंबीयांचे हाल सुरू असल्याची कैफियत चालकांनी मांडली, पण त्याचा फटका प्रवाशांना का? तेही सामान्य नागरिक असून त्यांनाही लॉकडाऊनचा फटका बसला आहेच, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.


डोंबिवली जिमखाना येथून स्टेशनकडे येण्यासाठी लॉकडाऊनआधी स्वतंत्र रिक्षा केल्यास ३० रुपये आकारले जायचे. आता मात्र थेट ५० रुपये आकारण्यात येतात. कल्याण-शीळ रस्त्यावरून सुयोग हॉटेलसमोरून रिक्षा केल्यास शेअरपद्धतीने १५ रुपये घेण्यात येत होते. आता त्यात वाढ करण्यात आली असून दोनऐवजी तीन प्रवासी घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिक हैराण असून कोरोना दूर होणार कसा, असा सवाल करत आहेत. स्वतंत्र रिक्षा केल्यास ३०, ५०, १०० रुपयेही घेतले जात आहेत. कल्याण येथे जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातून दोन सीट घेणे अपेक्षित असते, पण तसे होत नाही. अनेकदा तीन सीट घेतले जातात. त्या सगळ्यांकडून प्रत्येकी ५० रुपये आकारले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. रिक्षाचालक मास्क लावून असतात, पण रिक्षात सॅनिटायझर वगैरे नसल्याचे निदर्शनास आले.
मीटरप्रमाणे रिक्षा कुणीही चालवत नाही. आरटीओची कारवाई अनेक महिन्यांत झाली नाही, डोंबिवलीत लॉकडाऊनपासून आरटीओ अधिकारी आलेही नसल्याचे रिक्षाचालकांनीच सांगितले. त्यामुळे तक्रार, दाद कोणाकडे मागायची, असा सवाल प्रवाशांना पडला आहे.
- संबंधित वृत्त/३

प्रवाशांसाठी ताटकळत राहावे लागते
मुळात रिक्षा पाच महिने बंद होत्या. त्या कालावधीत रिक्षाचालकांचे हाल झाले असून अनेक जण कर्जबाजारी झाले. आता राज्य सरकारने रिक्षा व्यवसाय सुरू केला आहे, पण तरीही रेल्वे नसल्याने तो नावालाच आहे. कोणीही नागरिक पूर्वीसारखा घराबाहेर पडत नाही, त्यामुळे रिक्षा प्रवासाला चाप बसला आहे. अशा सर्व स्थितीत जरी दोन प्रवासी घ्यावेत, असे अपेक्षित असले तरी रिक्षाचालकांना एखाद्या स्टॅण्डवर दीड ते दोन तासांनी भाडे मिळते. प्रवाशांचीही तीन सीट बसवायला हरकत नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून रिक्षात तीन प्रवासी बसत असल्याचे आमच्याही निदर्शनास आले आहे.
- दत्ता माळेकर, वाहतूक सेल, कल्याण जिल्हाध्यक्ष, भाजप
कुणीही प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये, जे जादा आसन घेतात, त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी. भाडेही नियमानुसारच आकारायला हवे. तसेच जादा भाडे कोणी घेऊ नये. आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण विभाग,
रिक्षा-टॅक्सी महासंघ

यंत्रणांचा धाक
उरलेला नाही
सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणा खुजी झाली आहे. नियमाप्रमाणे काही करायचे नाही. कुणालाही काहीही पडले नाही. शिस्त लावायची कोणी? आरटीओ, वाहतूक शाखा हे फक्त केसेस करण्यात दंग आहेत. सरकारी यंत्रणा केवळ वसुली करण्यात व्यस्त आहेत का? असा सवाल आहे. त्यामुळे कुणाला या यंत्रणांचा धाक उरलेला नाही.
- काळू कोमास्कर, अध्यक्ष, लाल बावटा रिक्षा युनियन 

Web Title: Riksha travling in Dombivali with three passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.