ठाण्यात कार आणि रिक्षा अपघातात रिक्षाचालक जखमी; अपघातामुळे वाहतुक कोंडी
By जितेंद्र कालेकर | Updated: April 11, 2024 20:01 IST2024-04-11T19:59:47+5:302024-04-11T20:01:04+5:30
नवी मुंबईतील रिक्षाचालक सुनील जाधव (४०) हे जखमी झाले आहेत.

ठाण्यात कार आणि रिक्षा अपघातात रिक्षाचालक जखमी; अपघातामुळे वाहतुक कोंडी
ठाणे: माेटार कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात नवी मुंबईतील रिक्षाचालक सुनील जाधव (४०) हे जखमी झाले आहेत. या अपघातात रिक्षांमधील सीएनजी गॅसही गळती झाला होता. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान नितीन कंपनी समोरील रस्त्यावर घडली. याचदरम्यान या अपघाताचा परिणाम वाहतुकी कोंडीवर झाला होता. तत्काळ दोन्ही वाहने रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेने दिली.
रिक्षाचालक सुनील हा पांचपाखाडी येथून नवी मुंबई दिघा येथे निघाला होता. तर पांचपाखाडी येथून मुंबईला कार घेऊन अदालत खान निघाला होता. याचदरम्यान नितीन कंपनीजवळ दोघे आल्यावर हा अपघात झाला. तसेच रिक्षामधून गॅस गळती होऊ लागली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस कर्मचारी, महानगर गॅस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्य केले. या अपघातात जखमी झालेले रिक्षाचालक जाधव यांना तातडीने कळवा येथील
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातामुळे या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पाेलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही वाहतूक सुरळीत केली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.