डोंबिवलीत मालमत्ताकराची अव्वाच्या सव्वा बिले, दडपशाहीविरोधात एमआयडीसी परिसरातील रहिवाशांचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 22:28 IST2019-03-04T22:28:20+5:302019-03-04T22:28:57+5:30
केडीएमसीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर एमआयडीसी परिसरातील रहिवाशांना पाठवलेल्या मालमत्ता कराची बिले पाहून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

डोंबिवलीत मालमत्ताकराची अव्वाच्या सव्वा बिले, दडपशाहीविरोधात एमआयडीसी परिसरातील रहिवाशांचा ठराव
डोंबिवली - केडीएमसीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर एमआयडीसी परिसरातील रहिवाशांना पाठवलेल्या मालमत्ता कराची बिले पाहून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पूर्वीच्या बिलांच्या तुलनेत पाच ते आठ पट जास्त बिले आल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेची ही दडपशाही सहन करणार नाही असे सांगत रविवारी झालेल्या डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनच्या बैठकीत त्याविरोधात ठराव केला आहे.
बैठकीला सुमारे १५० रहिवासी उपस्थित असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी दिली. ते म्हणाले की, मुळात ही बिले खूपच उशिराने पाठवलेली आहेत. त्यात नमूद केलेली रक्कम ही अवाजवी असून ती भरणे अशक्य आहे. त्यामुळे ही बिले योग्य प्रमाणात कमी करून दिल्यास तात्काळ भरण्यासाठी संस्था पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले. महापालिकेने पाठवलेली बिले ही अन्यायकारक आहेत. रहिवाशांमध्ये एकजूट असून त्यांना फसवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले.
आयुक्त गोविंद बोडके, स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुभाष भोईर यांची भेट घेऊ न हा अन्याय दूर करण्यासाठी साकडे घालण्यात येईल.
तोंडी आश्वासन नको!
भरमसाट आलेली बिले कमी करण्याबाबत महापालिका कर्मचारी तोंडी सांगत आहेत; मात्र त्याबाबत लेखी देण्याबात ते तयार नाहीत. ही गंभीर बाब असल्याचे आयुक्त बोडके यांच्या लक्षात आणून देण्यात येणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. त्यावेळी सचिव राजू नलावडे, उपाध्यक्ष साई प्रसाद, सहकार्यवाह वर्षा महाडिक आदींसह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते रहिवासी उपस्थित होते.