नितीन पंडितभिवंडी - महापौरपदाच्या निवडणुकीला विलंब होत असून भाजपच्या हालचालींना वेग आल्याने येथे ‘चंद्रपूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्या पालिकेत काँग्रेस ३०, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, समाजवादी पार्टी ६, भाजप २२, शिंदेसेना १२, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ४ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी ४६ नगरसेवकांची गरज आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व समाजवादी पक्षांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंट तयार केला. मात्र त्यातून सपचे नगरसेवक बाहेर पडल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी (शरद पवार)चे खा. सुरेश म्हात्रे यांनी सपाला उपमहापौरपदाची ऑफर देत दोन दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. मात्र समाजवादीचाच महापौर हवा, अशी भूमिका आ. अबू आझमी यांनी घेतली आहे. त्यामुळे सेक्युलर फ्रंटमध्ये बिघाडी झाली आहे. तर भाजप व शिंदेसेनेकडे ३४ संख्याबळ आहे. महायुतीला सत्तास्थापनेस १२ नगरसेवकांची आवश्यकता आहे. मात्र, भाजपमध्ये नारायण चौधरी व सुमित पाटील यांच्यात दोन गट पडले आहे. भाजपमधील या दोन गटांना एकत्र आणण्यात श्रेष्ठींना मध्यस्थी करावी लागणार आहे.
कोणार्कने अपक्ष उमेदवाराला गटात घेतले आहे. त्यामुळे कोणार्कची संख्या ५ झाली आहे. सपाचे ६ नगरसेवकही कोणार्कच्या विलास पाटील यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणार्क व भिवंडी विकास आघाडीला सोबत घेऊन भाजप सत्तेची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. मात्र कोणार्कचे विलास पाटील आणि भाजपचे आ. महेश चौघुले यांच्यातील वादामुळे कोणार्क भाजपसोबत येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, कोणार्कची मनधरणी भाजपकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणार्कशी जुळवून घेतले तर भिवंडी विकास आघाडीच्या ३ सदस्यांनादेखील भाजप आपल्या बाजूने वळवून सत्ता स्थापन करू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महापौरपद निवडणूक होणार तरी कधी?महापौरपद निवडणुकीसंदर्भात अजूनही कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे महापौरपद निवडणुकीच्या तारखेबाबत निश्चित सांगता येणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.
विकासाच्या मुद्द्यावर पालिकेतील छोटे गट आणि इतर पक्षही भाजपसोबत आहेत. ते संपर्कात आहेत. या पक्षांच्या सहकार्याने भिवंडीत भाजपचाच महापौर विराजमान होणार आहे. आमच्या संपर्कात कोण आहेत, ते प्रत्यक्ष मातदानाच्या दिवशीच सर्वांना समजेल. - रविकांत सावंत, शहराध्यक्ष, भाजप
काँग्रेस महापालिकेत सर्वात मोठा पक्ष आहे. समाजवादी पार्टी ‘सेक्युलर’ असल्याचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्षात स्वार्थासाठी सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झालेली नाही. आमच्याकडे ४२ चे संख्याबळ आहे. आम्हाला चार सदस्यांची आवश्यकता आहे. लवकरच हे चार सदस्य सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होतील. महापालिकेत काँग्रेसचाच महापौर होणार. - रशीद ताहीर मोमीन, शहराध्यक्ष, काँग्रेस
Web Summary : Bhiwandi faces mayoral election delays. BJP eyes power, potentially repeating the Chandrapur pattern. Coalitions shift as parties vie for control amid internal disputes and strategic alliances.
Web Summary : भिवंडी में महापौर चुनाव में देरी। बीजेपी सत्ता पर नज़रें जमाए, चंद्रपुर पैटर्न दोहराने की संभावना। आंतरिक विवादों और रणनीतिक गठबंधनों के बीच पार्टियाँ नियंत्रण के लिए प्रतिस्पर्धा कर रही हैं।